पणजी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत हा खास सण साजरा केला आहे.पंतप्रधान मोदींनी आज(दि.२०) गोवा आणि कारवार किनाऱ्यावरील आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला भेट दिली. येथे पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या जवानांना संबोधित केले आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
आयएनएस विक्रांतवरील जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले, “आजचा दिवस अद्भुत आहे. हे दृश्य अत्यंत संस्मरणीय आहे. आज एका बाजूला माझ्यासमोर अथांग समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेचे शूर वीर जवान आहेत.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज एकीकडे माझ्याकडे अनंत क्षितिज आणि आकाश आहे, तर दुसरीकडे माझ्यासमोर ही विशाल आयएनएस विक्रांत आहे, ज्यामध्ये अनेक शक्ती एकवटल्या आहेत. समुद्राच्या पाण्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांची चमक म्हणजे जणू शूर सैनिकांनी प्रज्वलित केलेल्या दिवाळीच्या पणत्यांचे तेज आहे.”
आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना मोदी म्हणाले, “माझं भाग्य आहे की यंदाची ही पवित्र दिवाळी मी नौदलाच्या शूर सैनिकांमध्ये साजरी करत आहे. मी काल जेव्हा रात्री INS विक्रांतवर होतो, ते क्षण शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. मी पाहिलं की तुम्ही किती ऊर्जा आणि देशभक्तीने भरलेले आहात. जेव्हा मी तुम्हाला देशभक्तीपर गाणी गाताना पाहिलं आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ याचा तुम्ही गाण्यात उल्लेख केला, तेव्हा त्या अनुभवाचं वर्णन शब्दांनी करणं अशक्य आहे. ही भावना केवळ रणभूमीत उभा असलेला एक सैनिकच अनुभवू शकतो.”
जवानांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी इथे लष्करी उपकरणांची ताकद पाहिली. हे प्रचंड युद्धनौके, आकाशात वेगाने उडणारी विमाने, पाणबुडी हे सर्वच अद्भुत आहे. पण या सर्व गोष्टींना खरी ताकद देतात, त्या म्हणजे त्यांना चालवणारे धाडसी जवान. हे युद्धनौके जरी लोखंडाचे असले तरी जेव्हा तुम्ही त्यावर कार्य करता, तेव्हा त्या सजीव शक्तीचे रूप घेतात. मी कालपासून तुमच्यासोबत आहे. प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून गेला.”
“जेव्हा मी दिल्लीहून निघालो, तेव्हा वाटले की हा क्षण अनुभवावा. पण तुमचं समर्पण, मेहनत आणि शिस्त एवढ्या उच्च पातळीवर आहे की मी ते पूर्णपणे अनुभवू शकलो नाही. मात्र, त्याची जाणीव नक्कीच झाली. मी केवळ कल्पना करू शकतो की अशा जीवनशैलीला खर्या अर्थाने जगणं किती कठीण असतं.”
यावेळी नौदलाच्या जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “समुद्रातील गडद रात्री आणि आजच्या सूर्योदयाने माझी दिवाळी अनेक प्रकारे खास बनवली आहे. आयएनएस विक्रांतच्या डेकवरून मी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या कुटुंबियांनाही मनःपूर्वक दिवाळीच्या शुभेच्छा!”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode