दिवाळी जल्लोष नव्हे, तर राष्ट्रसेवेचे प्रतीक बनली होती
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : भारत-चीन युद्धाच्या एक वर्षानंतर 1963 मध्ये आलेल्या दिवाळीत सणाचा उत्साह नव्हता. प्रत्येक ठिकाणी दुःखाचे वातावरण होते आणि राष्ट्ररक्षणाची भावना प्रबळ होती. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोलवलकर (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली ‘सेवा दीपावली’ उपक्रम राबवून हा सण राष्ट्रीय एकता, सेवा आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनवला होता.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचा संकल्प
चीनने 20 ऑक्टोबर 1962 रोजी भारतावर आक्रमण केले होते. त्यादरम्यानच 28 ऑक्टोबर रोजी दिवाळी होती. त्याकाळी माहिती पोहोचवण्याची साधने मर्यादित होती, तरीही युद्धाच्या बातम्या हळूहळू देशभर पसरल्या. या संकटाच्या पार्श्वभूमीवर, संघाने 22 ऑक्टोबर 1962 रोजी 10 हजारांहून अधिक स्वयंसेवकांना तात्काळ सीमावर्ती भागांमध्ये लडाख, नेफा (सध्याचे अरुणाचल प्रदेश) आणि आसाम — सेवा कार्यासाठी पाठवले होते. ‘The RSS: A View to the Inside’ या पुस्तकानुसार, या निर्णयावर स्वतः गुरुजींची स्वाक्षरी होती. त्यावेळी 28 ऑक्टोबर 1962 च्या अंकात या सेवांबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले होते आणि स्वयंसेवकांच्या रेल्वे स्थानकांवरील फोटोही त्यात होते.
सेवेच्या क्षेत्रात संघाचे योगदान
युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची काळजी घेण्यासाठी संघाने नेफामध्ये 50 हून अधिक तात्पुरते रुग्णालये स्थापन केली, जिथे 2 हजारांहून अधिक सैनिकांवर स्वयंसेवकांनी उपचार केले. दिल्ली आणि कोलकाता येथे 20 मदत शिबिरे लावून तिबेटी निर्वासित व स्थानिक विस्थापितांना अन्न, कपडे आणि औषधे पुरवली गेली. याशिवाय, संघाने 1300 पेक्षा अधिक शहीद सैनिकांच्या कुटुंबांसाठी 50 लाख रुपयांची मदत गोळा केली आणि त्यांच्या विधवांना रोजगार प्रशिक्षण दिले, ज्यामधील 80 टक्के महिलांना नोकरीही मिळाली.
‘सीमा रक्षा अभियान’ व सामाजिक ऐक्य
युद्धविरामानंतर सीमावर्ती गावांचे रक्षण करण्यासाठी ‘सीमा रक्षा अभियान’ अंतर्गत 5 हजार स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले. आसाममध्ये 10 शस्त्रप्रशिक्षण शिबिरे आयोजित केली गेली आणि सेवानिवृत्त सैनिकांची मदत घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऐक्य बळकट करण्यासाठी डिसेंबर 1962 मध्ये संघाच्या प्रेरणेतून राष्ट्रीय एकता यात्रा काढण्यात आली, जी 20 हून अधिक राज्यांमधून गेली. लाखो लोक या यात्रेत सहभागी झाले आणि उत्तर-पूर्वेतील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की राष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे.
दीपासोबतच संघाच्या सेवेचा प्रकाश
देशात 1963 ची दिवाळी संघासाठी केवळ सण नव्हता, तर एक संकल्प होता. गुरुजींनी संदेश दिला, या दिवाळीत, फक्त आपले घरच नाही तर भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात सेवा दीप प्रज्वलित करा. देशभरातील शाखांना निर्देश देण्यात आले की हा सण ‘सेवा दीपावली’ म्हणून साजरा करावा. स्वयंसेवकांनी 50 हजारांहून अधिक गरजू कुटुंबांना रेशन, कपडे, मिठाई आणि आवश्यक वस्तू वाटल्या. नागपूरमध्ये 500 हून अधिक ठिकाणी गरीब वस्त्यांमध्ये व अनाथाश्रमांमध्ये दीप लावले गेले. या उपक्रमात दिवाळीचे प्रत्येक दिवस — धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा व भाऊबीज हे राष्ट्रसेवा आणि जनकल्याणाशी जोडले गेले. उदाहरणार्थ, भाऊबीजेला विस्थापित कुटुंबांना आपल्या भावंडांप्रमाणे भेटी देण्यात आल्या. संघाच्या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वयंसेवकांच्या सेवेची प्रशंसा केली आणि 1963 च्या गणराज्य दिन परेडमध्ये 3000 स्वयंसेवकांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.
राष्ट्रीय पुनर्निर्माणाची दिशा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मार्च 1963 मध्ये देशभरात 500 ‘राष्ट्र रक्षा शिबिरे’ भरवली, ज्यात 50 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याशिवाय, आसाममधील पूरग्रस्त 25 हजार नागरिकांच्या पुनर्वसनातही संघाने मोठी मदत केली. राष्ट्ररक्षणासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. यामाध्यमातून सीमावर्ती गावांमध्ये शाळा आणि रुग्णालये उभारण्यात आली. एकूण सुमारे 2 लाख नागरिकांना या उपक्रमांद्वारे थेट किंवा अप्रत्यक्षपणे मदत मिळाली.
सेवा दीपावली: एक प्रेरणा, एक परंपरा
संघाचा 1963 मधील ही ‘सेवा दीपावली’ केवळ एक विशेष सण न राहता एक प्रेरणास्त्रोत बनली. आजही ‘सेवा भारती’ आणि ‘सेवा इंटरनॅशनल’ यांसारख्या संघटनांमार्फत ही परंपरा जिवंत ठेवली जाते. सध्याच्या काळात, ज्या दिवाळीला प्रामुख्याने भोगवाद आणि बाजारपेठेचा रंग चढलेला आहे, अशा वेळेस ही ऐतिहासिक ‘सेवा दीपावली’ आपल्याला आठवण करून देते की खरी प्रकाशयात्रा ही सेवा, संवेदनशीलता आणि राष्ट्रभक्तीतूनच होते जी राष्ट्राच्या आत्म्याला प्रकाशित करते.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी