मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाडाची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील नेवार्ककडे जात असलेली एअर इंडिया फ्लाइट AI191 ला बुधवारी (२२ ऑक्टोबर) उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मुंबईत परत यावे लागले. टेकऑफनंतर तांत्रिक बिघाडाची शक्यता लक्षात येताच पायलटने योग्य वेळी निर्णय घेतला आणि विमान मुंबईत परत आणले. महत्त्वाचे म्हणजे विमानाची सुरक्षित लँडिंग झाली आहे.
हे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री १.१४ वाजता उड्डाण करत होते, परंतु उड्डाणाच्या साधारणतः अर्ध्या तासानंतर तांत्रिक अडचण निर्माण झाली. हे लक्षात आल्यावर पायलटने विमान मुंबईत परत आणण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर सकाळी सुमारे ३ वाजता विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सध्या विमानाची तपासणी एअर इंडियाच्या तांत्रिक टीमकडून केली जात आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जात आहे.
एअर इंडियाच्या अनेक फ्लाइट्समध्ये याआधीही तांत्रिक अडचणींच्या घटना समोर आल्या आहेत. १६ जून रोजी हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली होती. तसेच २१ जुलै रोजी दिल्ली-कोलकाता फ्लाइटमध्ये अडचण आल्याचे समोर आले होते. अशाच प्रकारे आणखी काही उड्डाणांमध्ये तांत्रिक बिघाडांच्या बातम्या येत राहिल्या आहेत.
दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे याच वर्षी १२ जून रोजी एअर इंडियाची एक फ्लाइट अहमदाबादमध्ये क्रॅश झाली होती. या अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला होता. तर या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode