आसियानच्या अध्यक्षपदाबद्दल पंतप्रधान मोदींनी मलेशियाच्या पंतप्रधानांचे केले अभिनंदन
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी स्नेह आणि सौहार्दपूर्ण संवाद साधला. यावेळी, मलेशियाने आसियानचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मोदींनी पंतप्रधान इब्राहिम यांचे हार्दिक अभिनंदन केले. मलेशियाच्या नेतृत्वाखाली आगामी आसियानसंबंधित शिखर परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदींनी आसियान-भारत शिखर परिषदेत आभासी पद्धतीने सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आणि आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:
“माझे प्रिय मित्र, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी स्नेह आणि सौहार्दपूर्ण संवाद साधला. मलेशियाच्या आसियान अध्यक्षपदाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी शिखर परिषदेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. आसियान-भारत शिखर परिषदेत व्हर्च्युअल पद्धतीने सामील होण्यास आणि आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी