* 22 ऑक्टोबरपर्यंत 60% हून अधिक सार्वजनिक तक्रारींचा निपटारा; 75% ई-फाईल्स बंद
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.) -
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) आणि त्याच्या संलग्न संस्था, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या (DARPG) मार्गदर्शनाखाली 'विशेष मोहीम 5.0' सक्रियपणे राबवत आहेत. सर्व कार्यालयांमधील स्वच्छतेला संस्थात्मक रूप देणे आणि शासकीय कामांमधील प्रलंबित प्रकरणे कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
अंमलबजावणीच्या टप्प्याच्या पहिल्या पंधरवड्यात, DPIIT ने अनेक निकषांवर उल्लेखनीय प्रगती केली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, पंतप्रधान कार्यालय, संसद सदस्य, राज्य सरकारे, मंत्रिमंडळ आणि सार्वजनिक तक्रारी किंवा अपील यासह सर्व श्रेणींमधील प्रलंबित संदर्भ शोधण्यात आले असून, त्यांचा दर्जेदार निपटारा करण्यासाठी पद्धतशीरपणे कार्यवाही केली जात आहे.
22 ऑक्टोबर 2025 पर्यंत, DPIIT ने 'विशेष मोहीम 5.0' अंतर्गत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. 47% हून अधिक पंतप्रधान कार्यालयीन संदर्भ आणि 60% हून अधिक सार्वजनिक तक्रारींचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला आहे. विभागाने लक्षांकित केलेल्या 75% हून अधिक ई-फाईल्स बंद केल्या आहेत, जे कार्यक्षम रेकॉर्ड व्यवस्थापनासाठी दृढ कटिबद्ध असल्याचे निदर्शक आहे . याव्यतिरिक्त, DPIIT आणि त्याच्या संलग्न संस्थांमध्ये 291 स्वच्छता मोहिमा — नियोजित उपक्रमांपैकी सुमारे 60% — आधीच पूर्ण झाल्या आहेत. हे प्रयत्न स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कार्यालयातील वातावरण सुधारण्यासाठीच्या निरंतर कृती दर्शवतात, ज्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एकूण अनुभव वाढतो.
2 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या 'विशेष मोहीम 5.0' पूर्वी, 15 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान पूर्वतयारीचा टप्पा पार पडला. या मोहिमेमुळे स्वच्छता, कार्यक्षम रेकॉर्ड व्यवस्थापन आणि प्रलंबित प्रकरणांचा वेळेवर निपटारा करण्याच्या महत्त्वाविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. DPIIT 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रलंबित प्रकरणांचा संपूर्ण निपटारा करण्यासाठी आणि आपल्या सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छतेच्या पद्धतींना संस्थात्मक रूप देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे एक स्वच्छ, अधिक कार्यक्षम आणि प्रतिसाद -सुलभ सरकारी कामकाजाचे वातावरण तयार होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी