आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना पाठविले पत्र
नागपूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : मध्य भारतातील औषध आणि रसायन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचे (सीडीएससीओ) प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याची मागणी एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांना पत्राद्वारे केलीय. त्या पत्राच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नड्डा यांच्याकडे मागणी पूर्ण करण्याची शिफारस केली आहे.
आशिष काळे यांनी पाठविलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार नागपूर हे आता मध्य भारतातील औषध, रसायन आणि बायोटेक उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
नागपूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर औषधनिर्मिती व फॉर्म्युलेशन युनिट्स, एक्सिपियंट उत्पादक, रुग्णालये, रक्तपेढी, वैद्यकीय उपकरण उद्योग तसेच फार्मसी कार्यरत आहेत. याशिवाय, मिहान प्रकल्पाच्या विस्तारामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीला गती मिळत असून, शहराचे धोरणात्मक महत्त्व वाढले आहे.
सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि गुजरातमधील उद्योगांना परवाना, मंजुरी आणि तपासणीसाठी दूरच्या सीडीएससीओ कार्यालयांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे विलंब, अधिक खर्च आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. नागपुरात हे कार्यालय स्थापन झाल्यास नियामक प्रक्रिया जलद होईल, उद्योगांचा भार कमी होईल आणि औषध उपलब्धतेची कार्यक्षमता वाढेल, असे निवेदनात नमूद आहे.
हा उपक्रम भारत सरकारच्या “Ease of Doing Business”, “Make in India” आणि “Health for All” या धोरणांशी सुसंगत असल्याचे एआयडीने स्पष्ट केले आहे. श्री. काळे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की नड्डा यांच्या नेतृत्वाखाली ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी लवकरच पूर्ण होईल. तसेच या प्रस्तावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis