हैद्राबाद , 23 ऑक्टोबर (हिं.स.)।तेलंगणामधील अफशा बेगम नावाच्या महिलेनं दावा केला आहे की तिचा पती मोहम्मद अहमद सध्या रशिया-युक्रेन युद्धाच्या मध्ये अडकला आहे. अफशा बेगमच्या म्हणण्यानुसार, तिचा पती या वर्षी एप्रिल महिन्यात तेलंगणाहून रशियाला गेला होता. त्याला कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, रशियात पोहोचल्याच्या काही दिवसांतचतो स्वतःला रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात ओढलेला आढळला. अलीकडेच अफशा बेगमनं परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची विनंती केली आहे की तिच्या पतीला वाचवण्यात मदत करावी.तिचा दावा आहे की अहमदला रशियात फसवलं गेलं आहे आणि त्याला जबरदस्तीने लष्करी प्रशिक्षण (कॉम्बॅट ट्रेनिंग) दिलं जात आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात अफशाने म्हटलं आहे की मुंबईतील एका कन्सल्टन्सी फर्मने तिच्या पतीला रशियातील एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरीचे आश्वासन दिलं होतं. करारानुसार, अहमद एप्रिल २०२५ मध्ये भारत सोडून रशियात पोहोचला होता. अफशा बेगमचा दावा आहे की तिच्या पतीला जवळपास एक महिना कामाशिवाय बसवून ठेवण्यात आलं, आणि नंतर आणखी ३० जणांसोबत दूरच्या भागात नेऊन जबरदस्तीने शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं.
तिच्या म्हणण्यानुसार, प्रशिक्षणानंतर २६ जणांना युक्रेनी सैन्याविरुद्ध लढण्यासाठी सीमावर्ती भागात पाठवण्यात आलं. सीमा भागात जात असताना, अहमद आर्मीच्या गाडीतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाला. त्यानं लढण्यास नकार दिला, पण त्याला धमकी दिली गेली की तो जर युक्रेनविरुद्ध लढला नाही तर त्याला ठार मारण्यात येईल.
दरम्यान, मोहम्मद अहमदनं रशियातून रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की त्याच्यासोबत प्रशिक्षण घेतलेल्या २५ जणांपैकी १७ जण ठार झाले, ज्यात एक भारतीयही होता.
त्या व्हिडिओमध्ये अहमद म्हणतो, “मी ज्या ठिकाणी आहे, ती सीमा आहे आणि इथे युद्ध सुरू आहे. आम्ही चार भारतीयांनी लढायला नकार दिला. त्यांनी आम्हाला धमकावलं आणि माझ्यावर तसेच आणखी एका व्यक्तीवर बंदूक ताणली. त्यांनी माझ्या मानेला बंदूक ठेवून सांगितलं की ते मला गोळी मारतील आणि असं दाखवतील की मला ड्रोन हल्ल्यात ठार केलं गेलं आहे.
माझ्या पायाला प्लास्टर आहे आणि मी चालू शकत नाही. कृपया त्या एजंटला सोडू नका, ज्याने मला इथे पाठवलं. त्यानं मला या सगळ्यात ओढलं. त्यानं मला २५ दिवस कामाशिवाय बसवून ठेवलं. मी वारंवार काम मागत राहिलो, पण काही उपयोग झाला नाही. मला रशियात नोकरीच्या नावाखाली जबरदस्तीने या युद्धात ओढण्यात आलं.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode