लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
#फ्रेशर्स पार्टीतील मारहाणीतून विद्यार्थ्याचा मृत्यू
पोलिस निरीक्षक समाधान चौरेंनी तपासाची चक्रे फिरवताच सहा आरोपींना अटक
लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील एका महाविद्यालयात आयोजित फ्रेशर्स पार्टीदरम्यान झालेल्या मारहाणीतून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या घटनेनंतर फिर्यादी आदित्य मनेश गायकवाड (वय १९ वर्षे, रा. गायत्रीनगर, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७५१/२०२५ हा कलम १०९, ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) बी.एन.एस. प्रमाणे दिनांक ०८/१०/२०२५ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी एमआयडीसी परिसरातील एका महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीदरम्यान नाचताना झालेल्या धक्काबुककीच्या किरकोळ कारणावरून सूरज शिंदे याचा इतर विद्यार्थ्यांशी वाद झाला.
वादाच्या दरम्यान रीहान शेख, इरफान पठाण आणि त्यांचे आणखी दोन साथीदार यांनी सूरजवर काठीने आणि हाताने मारहाण केली. या मारहाणीत सूरज शिंदे गंभीर जखमी झाला त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर तातडीने कारवाई करत रीहान शेख, इरफान पठाण आणि इतर दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
एमआयडीसी पोलीसांनी जलद गतीने तपास करून सदर चारही आरोपींना दिनांक १६/१०/२०२५ पर्यंत अटक केली.
#तपासादरम्यान नवे आरोपी उघडकीस
गुन्ह्याच्या पुढील तपासादरम्यान गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे यांच्या आधारे या घटनेत आणखी दोन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपींची नावे पुढीलप्रमाणे.
१) शहाबाज गफार शेख, वय २४ वर्षे, रा. उटी, ता. व जि. लातूर, ह.मु. चौधरीनगर, लातूर.
२) प्रितम ऊर्फ मोन्या दत्ता करंजीकर, वय १९ वर्षे, रा. न्यू भाग्यनगर, लातूर.
यांना एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दिनांक २१/१०/२०२५ रोजी सदर दोन्ही आरोपींना अटक केली.
आतापर्यंत या प्रकरणातील एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री.अमोल तांबे, यांच्या आदेश व सूचनेवरून पोलीस अधीक्षक, लातूर, श्री. मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, लातूर, साहेबराव नरवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर ग्रामीण चार्ज – लातूर शहर)
मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली अमलात आणलेली पथकामधील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार, सहाय्यक फौजदार भिमराव बेल्लाळे, पोलीस अंमलदार दयानंद आरदवाड विश्वनाथ डोंगरे, बळवंत भोसले, दामोदर मुळे, राजाभाऊ म्हस्के, राजू मस्के, अक्षय डिगोळे, भोरे या सर्वांनी समन्वयाने काम करत आरोपींचा शोध घेत अटक करण्यात यश मिळवले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार हे करीत आहेत. तपासादरम्यान प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे आवश्यक ती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
#पोलीस विभागाचे आवाहन
लातूर पोलीस विभाग सर्व नागरिकांना आवाहन करतो की, अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना टाळण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य व शिस्तीची जाणीव निर्माण करावी. तसेच नागरिकांनी गुन्हेगारी अथवा हिंसक प्रकारांची कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis