देहरादून, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।केदारनाथ मंदिराचे कपाट आज, गुरुवारी, भाऊबीजेच्या पवित्र पर्वानिमित्त, सकाळी ८:३० वाजता वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक परंपरांनुसार हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले.हजारो भक्तांनी या प्रसंगी भगवान केदारनाथाचे दर्शन घेतले. संपूर्ण केदारघाटी “हर हर महादेव” आणि “जय बाबा केदार” या जयघोषांनी दुमदुमली. या वेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील धामात उपस्थित होते.
आता पुढील सहा महिन्यांपर्यंत भगवान केदारनाथाची पूजा ऊखीमठ येथील हिवाळी गद्दीस्थान ओंकारेश्वर मंदिरात होईल.कपाट बंद होण्याच्या निमित्ताने केदारनाथ मंदिर फुलांनी सुंदर सजविण्यात आले होते. बुधवारी भगवान केदारनाथाची चलविग्रह पंचमुखी डोली मंदिराच्या सभामंडपात विराजमान करण्यात आली होती. कपाट बंद करण्याची प्रक्रिया विशेष पूजांसह पहाटे चार वाजल्यापासून सुरू झाली होती.
आज सकाळी सर्वप्रथम भगवान केदारनाथाची पंचमुखी चलविग्रह डोली सभामंडपातून बाहेर आणण्यात आली.यानंतर डोलीची मंदिर प्रदक्षिणा (परिक्रमा) घालण्यात आली आणि जयघोषांच्या गजरात मंदिराचे कपाट बंद करण्यात आले.आज संध्याकाळी भगवान केदारनाथाची डोली भक्तांसह रामपूर येथे रात्र प्रवासासाठी थांबेल.
कपाट बंद होण्याच्या या प्रसंगी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, बीकेटीसी अध्यक्ष हेमंत द्विवेदी, उपाध्यक्ष ऋषि प्रसाद सती, विजय कप्रवाण, केदारसभा अध्यक्ष पंडित राजकुमार तिवारी, केदारसभा मंत्री पंडित अंकित प्रसाद सेमवाल, धर्माधिकारी ओंकार शुक्ला, पुजारी बागेश लिंग, आचार्य संजय तिवारी, अखिलेश शुक्ला आदी उपस्थित होते.
या वर्षीच्या केदारनाथ यात्रेदरम्यान तब्बल १७.३९ लाख श्रद्धाळूंनी भगवान केदारनाथाचे दर्शन घेऊन पुण्यसंचय केला. यात्रेच्या सुरुवातीपासूनच केदारनाथ धामात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बुधवारीदेखील ५,००० पेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी पोहोचले होते. सध्या केदारनाथमध्ये तीव्र थंडी जाणवू लागली आहे. बुधवारी दुपारनंतर धुके पसरल्याने तीर्थयात्री संध्याकाळीच खोल्यांमध्ये परतले.
आज यमुनोत्रीमध्येही माता यमुना मंदिराचे कपाट दुपारी १२:३० वाजता हिवाळ्यासाठी बंद करण्यात येणार आहेत.यानंतर माता यमुनेची उत्सव मूर्ती खरसाली गावात दर्शनासाठी ठेवली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode