नागपूर, 23 ऑक्टोबर (हिंस.) : जंगलात राहणारे नक्षलवादी थेट बंदुकीने लढत असल्याने आपला शत्रु कोण..? हे ठाऊक असल्याने त्यांच्याशी लढणे सोपे जाते. परंतु, त्यातुलनेत अर्बन नक्सल (शहरी नक्षलवादी) यांच्याशी लढा देणे कठीण आहे. अर्बन नक्सल हे समाजासाठी नवे आव्हान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपुरातील रामगिरी या मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, माओवाद महाराष्ट्रात जवळपास संपुष्टात आला आहे आणि छत्तीसगडमधूनही लवकरच हद्दपार होईल. जंगलात राहून बंदुकीने हिंसाचार करणाऱ्या नक्षलवाद्यांशी लढणे सोपे असते. आपला नेमका शत्रु कोण हे ठाऊक असल्याने तिथे लढणे आणि मारणे अशा दोनच गोष्टी असतात. परंतु, अर्बन नक्षलवाद हे नव्या स्वरूपातील आव्हान असून त्यात शत्रू कोण आहे हेच स्पष्ट नसते. जंगलातील नक्षलवादात समोरचा शत्रू दिसतो, पण शहरी नक्षलवादात तो लपलेला असतो. त्यामुळे शहरी नक्षलवाद हे सरकारसमोर उभे राहिलेले एक गंभीर आणि बहुआयामी आव्हान असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा नव्हे, नेत्यांचा विरोध
धाराशिवपर्यंत शक्तिपीठ महामार्गाला कुठलीही अडचण नाही. सुमारे 95 टक्के लोकांचे समर्थन आहे. मुळात नेत्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांचा नाही. मध्यंतरी मोठा मोर्चा निघाला. आलयमेंट चेंज करून चंदगडवरून नेणार असे ठरले. आता नव्याने सोलापूर सांगलीमार्ग असा पण पर्याय आला आहे. सर्व दृष्टीने कमीत कमी सुपीक शेत जमिनीचे भूसंपादन व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. शेवटी कुठलाही विकास प्रकल्प असू द्या, विरोध हा होतच असतो. शेतकऱ्यांशी चर्चेतून मोबदला चांगला असेल, तर विरोध होत नाही, हा आपला अनुभव आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाशिक कुंभमेळा 2027 साठी तयारी
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी जोमात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयागराजच्या तुलनेत नाशिकमध्ये जागा कमी आहे. प्रयागराजमध्ये 15 हजार हेक्टर जागा उपलब्ध होती, तर नाशिक व त्र्यंबकेश्वर मिळून केवळ 500 एकर आहे. तरीदेखील सर्व भाविकांना स्नानाची सुविधा मिळावी यासाठी नियोजन सुरू आहे. 2026 पासून कुंभप्रचार मोहीम सुरू करू, असे फडणवीस म्हणाले.
विदर्भाच्या विकासावर दृष्टी
नळगंगा–पैनगंगा नदी जोड प्रकल्पाबाबत त्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा डीपीआर तयार असून काही मान्यतांची प्रक्रिया सुरू आहे. मार्चपासून जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे.त्याचबरोबर समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरच्या दर अतिशय जास्त असल्याने तो रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विक्री हमीभावाखाली करू नये, असे आवाहन त्यांनी केले. “सरकार लवकरच शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे, जेणेकरून हमीभावाच्या अंमलबजावणीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल.”
जात जनतेच्या नव्हे नेत्यांच्या डोक्यात
जातीय राजकारणावर भाष्य करत त्यांनी सांगितले की, निवडणुका जवळ आल्या की जातींचे मुद्दे पुढे आणले जातात. हे मुद्दे मतदारांपेक्षा नेत्यांच्या मनात जास्त असतात. स्थानिक निवडणुका संपल्यानंतर हे विषय आपोआप मागे पडतील.विरोधकांवर टीका करत फडणवीस म्हणाले, “काँग्रेस आज अल्ट्रा-लेफ्टिस्ट विचारसरणीने ग्रस्त झाली आहे. इंदिरा गांधींच्या काळातही असे घडले नव्हते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सरकारवर नव्हे तर संविधानिक संस्थांवर हल्ला करणे सुरू केले आहे, जे देशासाठी धोकादायक आहे.
मतदार याद्या आणि निवडणुका
मतदार याद्यांमधील विसंगतींबाबत फडणवीस म्हणाले की, मी 2012 पासून या विषयावर उच्च न्यायालयात याचिकाकर्ता आहे. ही समस्या ग्रामीण भागात नव्हे, तर शहरी भागात जास्त आहे. विरोधकांनी जर दुहेरी मतदानाचे पुरावे सादर केले, तर आम्हीही त्यांच्या मतदार याद्यांमधील त्रुटी समोर आणू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले, जिथे फायद्याचे तिथे युती करू, जिथे फायद्याचे नाही तिथे स्वतंत्र लढू. उदाहरणार्थ, पिंपरी-चिंचवडमध्ये युती केल्यास आमचे कार्यकर्ते नाराज होतील, त्यामुळे तिथे स्वतंत्रपणे लढू. मात्र मुंबईत शंभर टक्के युती होणार आहे.
टाटांच्या ताल प्रकल्पाच्या विस्ताराचे संकेत
टाटा समूहाच्या नागपूर येथील ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स लिमिटेड या औद्योगिक प्रकल्पाच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिलेत. गुजरातमधील टाटा-एअरबस विमाननिर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सुटे भाग आणि यंत्रसामग्री आता नागपूरमध्ये तयार केली जाणार आहेत. यामुळे नागपूर पुन्हा एकदा देशाच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.टाटा-एअरबस प्रकल्प हा भारतातील संरक्षण व नागरी विमाननिर्मिती क्षेत्रातील पहिला मोठा खासगी उद्योग मानला जातो. वडोदरा येथे सुरू झालेल्या या प्रकल्पाअंतर्गत आधुनिक C-295 MW परिवहन विमानांची निर्मिती केली जात आहे. या विमानांसाठी लागणारे अनेक घटक, सब-असेम्ब्ली आणि तपासणी प्रणाली नागपूरमधील टाल प्रकल्पात तयार करण्यात येणार आहेत.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी