
पुणे, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहारावरून थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आरोपांची सरबत्ती सुरू केली होती. मुरलीधर मोहोळ यांनी माझा या व्यवहारात सहभाग नसल्याचं सांगितलं होतं. आता जमीन खरेदी केलेल्या विशाल गोखले यांनीच जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय़ घेतल्याचं सांगितलं आहे. गेल्या दोन आठवड्यापासून जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून पुण्यातलं राजकारण तापलं होतं.
बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊससोबत जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी त्यांनी ईमेलवरून ट्रस्टला माहिती दिली आहे. या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय़ हा नैतिकतेच्या मुद्द्यावर घेतला असल्याचं त्यांनी सांगितलंय. आम्हाला जैन धर्मीयांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असंही विशाल गोखले म्हणाले आहेत.
माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेत आपण या प्रकरणी जैन समाजासोबत असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी काही जैन बांधवांनी मोहोळ यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु