
वॉशिंग्टन, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संबंधित जगदीप सिंग उर्फ ‘जग्गा’ याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अँटी गँगस्टर टास्क फोर्स (एजिटीएफ) कडून मिळालेल्या माहिती आणि समन्वयानंतर करण्यात आली. जग्गा बराच काळ भारतातून फरार होता आणि परदेशातून टोळीच्या कारवायांचे संचालन करत होता.
चौकशी यंत्रणांच्या माहितीनुसार, जगदीप सिंग उर्फ जग्गा सुमारे तीन वर्षांपूर्वी भारतातून दुबईला पळून गेला होता आणि तेथून बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत पोहोचला. अमेरिकेत राहून तो लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य रोहित गोदारा याच्यासाठी काम करत होता आणि परदेशातून टोळीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवत होता.पोलीस सूत्रांच्या मते, जग्गाच्या विरोधात राजस्थान आणि पंजाबमध्ये एकूण 11 गुन्हे नोंदवलेले आहेत. या प्रकरणांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि धमकी यांसारखे गंभीर आरोप आहेत. त्याच्याविरोधात जोधपूर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. जग्गा पूर्वी जोधपूरमधील वासुदेव इसराणी हत्या प्रकरणातही आरोपी राहिला आहे. त्या प्रकरणात तो लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्यासह तुरुंगात होता.
नंतर जामिनावर सुटल्यानंतर तो दुबईला पळाला, आणि तेथून पुन्हा टोळीसाठी काम सुरू केले. एजिटीएफने जग्गाच्या लोकेशन आणि नेटवर्कसंबंधी माहिती अमेरिकन एजन्सी आणि इंटरपोलसोबत शेअर केली होती. या माहितीच्या आधारे अमेरिकेतील स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थांनी त्याला अटक केली. आता भारत सरकार जग्गाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode