
पोलिसांची दोन नंबरवाल्यांसोबत मिलीभगत
जळगाव, 29 ऑक्टोबर (हिं.स.) मंगळवारी उघडकीस आलेल्या चोरीत चोरट्यांनी मुद्देमालासह महत्वाची कागदपत्रे व सीडीची देखील चोरी केली असून ही कागदपत्रे व सीडी चोरण्याचा नेमका उद्देश काय? असा सवाल ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रपरिषदेत केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालीत डल्ला मारला. दिवाळीच्या काळातच चोरट्यांनी खडसेंच्या घराला लक्ष्य केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या संदर्भात श्री. खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका विषद केली. श्री. खडसे म्हणाले की, चोरटे येण्याच्या अगोदर रस्त्यावरील लाईट बंद झाले. लाईट बंद झाल्यानंतर तीन चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. चोरी झाल्यानंतर चोरटे मोटारसायकलवर तीन बॅग ठेवतांना दिसत असून यात ते काय घेवून गेले याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. चोरट्यांचा उद्देश केवळ चोरी करणे हा असता तर त्यांनी सोने-चांदी, रोख रक्कम घेवून पोबारा केला असता मात्र चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममधील कपाटातून महत्वाची कागदपत्रे व काही सीडीची चोरी केली आहे. हे कागदपत्रे व सीडी काही घोटाळ्यांच्या संदर्भातील असून त्यात मोठे मासे अडकलेले आहेत. साधारणत: अडीच हजार झेरॉक्स व दहा-पंधराच्या वर सीडी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. पोलीस तपास करीत असल्याने थेट कुणावरही आरोप करणे आत्ताच योग्य होणार नाही असे म्हणत त्यांनी या प्रकरणाचे सहस्य वाढविले आहे. पोलिसांचे दोन नंबरवाल्यांशी साटेलोटे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे, अवैध दारु, वाळू यांचा उच्छाद सुरु असूनही हे प्रकार बंद करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. मी स्वत: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना लेखी स्वरुपाचे निवेदन दिले असतांनाही हे प्रकार बंद झालेले नाही.
जिल्ह्यात अप्रिय घटना दिवसेंदिवस वाढत असतांनाही पोलीस मात्र आर्थिक व्यवहारात गुंतलेले आहेत. पोलिसांचे आणि दोन नबंरवाल्यांचे घनिष्ठ संबंध असून त्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप श्री. खडसे यांनी केला. जिल्ह्यात खून, दरोडा, चोरी, महिलांवरील अत्याचार, वाढते अवैध धंदे या संदर्भात गेल्या काही दिवसात 27 वेळा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असतांनाही कारवार्इ मात्र शून्य झालेली आहे. प्रशासनावर कुणाचाही वचक नसल्याचे यातून स्पष्ट होत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी केवळ या अवैध धंद्यातून पैसा कमविण्याचा मागे धावत असल्याचे दुर्दैवी चित्र जिल्ह्यात पहावयाच मिळत आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या साऱ्या प्रकरणात लक्ष देणे क्रमप्राप्त असतांनाही त्यांच्याकडून देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर