
समृद्धी महामार्गावर टायर्स पेटवून वाहतूक रोखली
नागपूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.) : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज, बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलक शेतकऱ्यांनी राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी तत्काळ आणि बिनशर्त कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. शेकडो शेतकरी नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-44) जमले आणि वाहतूक रोखली. या वेळी त्यांनी शेती संकटाच्या प्रश्नावर राज्य सरकारच्या “निष्क्रियतेविरोधात” घोषणाबाजी केली. दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागले असून समृद्धी महामार्गावर टायर्स पेटवून आंदोलकांनी वाहतूक रोखली होती.
प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू म्हणाले की ,“जर सरकारने तातडीने कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू. आता आम्ही दुपारी रेल्वे रोखू. आमचे शेतकरी कर्जात बुडाले आहेत. राज्य सरकारकडे पैसा नसेल, तर केंद्र सरकारने मदत करावी.कडू यांनी सरकारवर पीकभरपाई, भावाची हमी आणि बोनस देण्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी 6 हजार रुपये प्रती क्विंटल दर आणि प्रत्येक पिकावर 20 टक्के बोनस देण्याची मागणी केली आहे. कडू म्हणाले, “मध्यप्रदेशात भावांतर योजना राबवली जाते, पण महाराष्ट्रात एकाही पिकाला योग्य दर मिळत नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटायलाही तयार नाहीत.”त्यांनी दावा केला की 1 ते 1.5 लाख शेतकरी आधीच आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर गुरुवारपर्यंत ही संख्या दुप्पट होईल. सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत.
सरकारच्या मदत योजना आणि विरोधकांची नाराजी
या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 29 जिल्ह्यांतील पूरग्रस्त आणि अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटीं रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली होती. या योजनेत 68 लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना 10 हजार रुपये रोख मदत देण्याचे ठरविण्यात आले आहे.मात्र, आंदोलनकर्त्यांनी या पॅकेजला “अपुरे” म्हणत पूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की फक्त अल्पकालीन मदत देऊन ग्रामीण संकटावर मात करणे शक्य नाही.
केंद्र सरकारची भूमिका
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत.त्यांनी माहिती दिली की राज्य सरकारने 2 हजार 15 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले असून, त्याचा 31 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना 10 हजार रुपये रोख मदत, 35 किलो धान्य, तसेच कर्ज वसुलीवरील स्थगिती आणि भू-राजस्व व परीक्षा शुल्कात सूट देण्यात आली आहे.-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी