
नवी दिल्ली , 29 ऑक्टोबर (हिं.स.)।भारताने गणतंत्र दिन 2026 साठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यावेळी युरोपियन युनियन (ईयू ) चे दोन सर्वोच्च नेते, युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि युरोपियन परिषद अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येणार आहे. हा पहिलाच प्रसंग असेल, जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे दोन सर्वोच्च नेते एकाच वेळी भारताच्या या प्रतिष्ठित राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होतील.
जानेवारी 2026 मध्ये हे दोन्ही नेते नवी दिल्लीत पोहोचतील. हा कार्यक्रम भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील वाढत्या धोरणात्मक, आर्थिक आणि राजनैतिक संबंधांना नवीन दिशा आणि बळ देणारा ठरेल, असे मानले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ईयू नेत्यांना गणतंत्र दिन 2026 चे मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि नवी दिल्ली तसेच ब्रुसेल्स लवकरच या औपचारिक निमंत्रणाची आणि स्वीकृतीची घोषणा करतील. गणतंत्र दिनाच्या मुख्य अतिथी म्हणून कोणत्याही परदेशी नेत्याला आमंत्रित करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रतीकात्मक पाऊल मानले जाते. हे केवळ एक औपचारिक निमंत्रण नसते, तर त्यातून भारताच्या धोरणात्मक, आर्थिक आणि भू-राजकीय प्राधान्यांचा परावर्तित होतो.
भारत दरवर्षी 26 जानेवारीला गणतंत्र दिन साजरा करतो. हा दिवस 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण करून देतो. हा सोहळा भारताच्या लोकशाही वारशाचे आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीचे प्रतीक मानला जातो. आजवर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख या सोहळ्याचे मुख्य अतिथी राहिले आहेत. 2025 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियान्तो हे मुख्य अतिथी होते, तर 2026 मध्ये युरोपियन युनियनच्या दोन सर्वोच्च नेत्यांची — उर्सुला वॉन डेर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा यांची — मेजवानी भारताच्या कूटनीतिक इतिहासात एक नवीन अध्याय जोडेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode