क्वालालंपूरमध्ये १२व्या आसियान संरक्षण बैठकीला राजनाथ सिंह राहणार उपस्थित
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। मलेशियात क्वालालंपूर येथे 1 नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या 12व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या – प्लस बैठकीला (एडीएमएम-प्लस) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. ‘एडीएमएम-प्लसच्या 15 वर्षांच्या कामगिरीबद्दल
Defence Minister Rajnath Singh


नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। मलेशियात क्वालालंपूर येथे 1 नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या 12व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या – प्लस बैठकीला (एडीएमएम-प्लस) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. ‘एडीएमएम-प्लसच्या 15 वर्षांच्या कामगिरीबद्दल विचारमंथन आणि आगामी वाटचालीची आखणी’ या विषयावर ते व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करतील.

सदर कार्यक्रमाच्या जोडीला, मलेशियाच्या अध्यक्षतेखाली 31 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या आसियान-भारत संरक्षण मंत्रीस्तरीय अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व आसियान सदस्य देशांचे संरक्षणमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत.आसियान सदस्य देश आणि भारत यांच्या दरम्यान संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्य आणखी मजबूत करणे आणि ‘अ‍ॅक्ट इस्ट धोरणा’ला पुढे नेणे हा या बैठकीच्या आयोजनाचा उद्देश आहे.

या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी एडीएमएम-प्लस देशांचे संरक्षणमंत्री तसेच मलेशियाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील.

एडीएमएम ही आसियान (आग्नेय आशियाई देशांची संघटना) संघटनेतील संरक्षण सल्ला आणि सहकार संदर्भातील सर्वोच्च यंत्रणा आहे. एडीएमएम-प्लस हा आसियान सदस्य देश (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया,म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, तिमोर लेस्ते आणि व्हिएतनाम) आणि त्यांचे आठ संवादी भागीदार देश (भारत, अमेरिका, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड) यांच्यातील सुरक्षा आणि संरक्षण संबंधित सहकार्य बळकट करण्यासाठी निर्मित मंच आहे.

भारत 1992 मध्ये आसियान संघटनेचा संवादी भागीदार झाला आणि 12 ऑक्टोबर, 2010 रोजी व्हिएतनाममध्ये हनोई येथे एडीएमएम-प्लसचा उद्घाटनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वर्ष 2017 पासून आसियान सदस्य देश आणि प्लस देशांमध्ये संरक्षण विषयक सहकार्याला अधिक चालना देण्यासाठी दर वर्षी एडीएमएम-प्लस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

एडीएमएम-प्लस कार्यक्रमाच्या आराखड्याअंतर्गत, 2024-2027 या कालावधीत भारत मलेशियासह दहशतवाद विरोधी तज्ञांच्या कृतीगटाचे सहअध्यक्षपद भूषवत आहे. वर्ष 2026 मध्ये आसियान-भारत सागरी सरावाच्या दुसऱ्या वर्षीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande