भक्तिरसात न्हाली अंबादेवी-एकवीरा देवीची पालखी यात्रा, हजारो भक्त सहभागी
अमरावती, 3 ऑक्टोबर (हिं.स.) प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी यांची सीमोल्लंघन यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या निमित्ताने श्री अं
भक्तिरसात न्हालेली अंबादेवी-एकवीरा देवीची पालखी यात्रा हजारो भक्त पालकी यात्रेत सहभागी


अमरावती, 3 ऑक्टोबर (हिं.स.)

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी यांची सीमोल्लंघन यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या निमित्ताने श्री अंबादेवी मंदिर संस्थान व श्री एकवीरादेवी संस्थानतर्फे दोन्ही देवतांच्या उत्सव मूर्तींना सजविलेल्या पालख्यांमध्ये विराजमान करून नगरभ्रमण घडविण्यात आले.

ही भव्य शोभायात्रा मंदिर संस्थानातून प्रारंभ होऊन भुतेश्वर चौक, रविनगर मार्गे बियाणी महाविद्यालय परिसरात पोहोचली. तेथे पालखी पूजनानंतर यात्रेचा समारोप करण्यात आला. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी भाविक भक्तांनी अंबादेवी व एकवीरादेवीच्या उत्सव मूर्तींचे दर्शन व पूजन केले. शोभायात्रेचे विविध ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.यात्रा मार्ग रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता तसेच फुलांच्या माळांनी मार्ग खुलविण्यात आला होता. यावेळी सम्पूर्ण वातावरणात भक्तीमय उर्जा दरवळत होती. ढोल-ताशा, हलगी, लेझीम पथक व भजन मंडळांनी वातावरण अधिकच उत्साहवर्धक बनवले होते.

या पालखी शोभायात्रेमध्ये अंबादेवी व एकवीरादेवी मंदिराचे सर्व विश्वस्त, भक्तगण व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रा शांततेत व भक्तिभावात पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande