अमरावती, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
अमरावतीत दसऱ्याच्या पर्वावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गा माता महादौड उत्साह, भक्ती आणि शौर्याच्या वातावरणात संपन्न झाली. ही महादौड केवळ शारीरिक नव्हे, तर धर्म, देशभक्ती आणि मातृशक्तीचा जागर करणारी होती.
शहरातील स्वागत नवदुर्गा मंडळापासून सुरुवात झालेल्या या दौडीस भगव्या पताकांनी, घोषणांनी आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी हजारो धारकाऱ्यांनी रंगत आणली. यामध्ये महिलांचा शस्त्रप्रदर्शन पथक, शिवाजी महाराज व जिजाऊ यांची झांकी आणि लहान मुलांचा सहभाग विशेष आकर्षण ठरले.या वेळी ध्वजवाहक म्हणून शुभम कामनापूरे यांना सन्मान मिळाला. राजापेठ येथे खासदार डॉ. अनिल बोंडे व अरुण पडोळे यांनी ध्वजवाहकत्व स्वीकारले. कोल्हापूरहून आणलेल्या पवित्र भंडाऱ्याची उधळण झाली. 2000 ते 2500 धारकाऱ्यांनी तिन्ही रांगेत शिस्तबद्ध धाव घेतली.
महिलांनी केलेल्या शस्त्रप्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली, तर नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले. महादौडीतून धर्म-संस्कृती रक्षण, मातृशक्तीचा गौरव आणि एकात्मतेचा संदेश दिला गेला.ही महादौड अमरावतीच्या इतिहासातील एक संस्मरणीय पर्व बनली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी