दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी तेजीत
मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खरेदीकडे दिसून आला. सकाळी खरेदीत विशेष उत्साह नव्हता, मात्र दुपारनंतर सराफा बाजारात खरेदीची ज
Gold buying


मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खरेदीकडे दिसून आला. सकाळी खरेदीत विशेष उत्साह नव्हता, मात्र दुपारनंतर सराफा बाजारात खरेदीची जोरदार लाट उसळली. मागील वर्षीप्रमाणे यंदाही दागिन्यांच्या खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. एक ते पाच ग्रॅम दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. तर दोन हजार ३०० कोटी रुपयांच्या घरात ही उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात दररोज किमान पाचशे रुपयांनी वाढ होत आहे. यावर्षी दसऱ्याला एक तोळा सोने १.२४ लाख रुपयांवर पोहोचले तर चांदीचा भाव एका किलोसाठी १.५४ लाख रुपये नोंदवला गेला. बुधवारी हेच दर अनुक्रमे १.२१ लाख आणि १.५२ लाख होते. दुपारपर्यंत ग्राहकांचा उत्साह मर्यादित असला तरी संध्याकाळच्या सुमारास खरेदीदारांचा ओघ वाढल्याने बाजारात चैतन्य परतले. लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने सोन्याचे कडे, ब्रेसलेट, बाजूबंद, मंगळसूत्र यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. यंदा सोन्याच्या नाण्यांना चांगली मागणी होती. मात्र दर उच्चांकी असल्याने पाच ग्रॅमऐवजी एक व दोन ग्रॅमची नाणी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा होता. त्याचवेळी ग्राहक चांदीची नाणीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत होते. चांदीचे दर उच्चांकावर असताना आणखी दरवाढ होईल, या शक्यतेने पाच, दहा, २०, ३० व ५० ग्रॅमच्या नाण्यांना मोठी मागणी होती. चांदीचा दर गुरुवारी १.५२ लाख रुपये किलोदरम्यान होता. देशातील समाधानकारक पावसाळा, केंद्र सरकारच्या कर कपातीमुळे वाढलेली खरेदी क्षमता, आकर्षक योजना आणि शुभ मुहूर्तावर खरेदीची परंपरा या कारणांमुळे यंदा सराफा बाजारात मागणी अधिक असल्याचे दिसून आले. मुंबई सराफा बाजारात मंगळवारीच्या तुलनेत सोन्याचा भाव प्रति तोळा ५५० रुपयांनी घटून १,१८,६९० रुपयांवर आला, तर चांदीने प्रति किलो १,४५,७१५ रुपयांचा उच्चांक गाठला. किरकोळ सराफ पेढ्यांमध्ये कर व शुल्क धरून भाव आणखी वाढलेले होते, तरी परंपरेमुळे खरेदी जोमात सुरू होती.

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ यांनी सांगितले की दागिन्यांव्यतिरिक्त पदके, वळी, नाणी तसेच हिऱ्यांचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंनाही मागणी मिळाली आहे. याशिवाय गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंडातील गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड बाँड्सकडेही ग्राहकांचा कल वाढत आहे. जागतिक अनिश्चितता, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून अपेक्षित व्याजदर कपात आणि डॉलर कमकुवत होण्याच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्षाअखेरीस सोने १.२० लाख रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १.५० लाख रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचू शकते, असा अंदाज सेबी नोंदणीकृत विश्लेषक अनुज गुप्ता यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande