परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सगळीकडे झालेली अतिवृष्टी आणि गोदावरीला आलेला महापूर यामुळे गंगाखेडला अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन करण्याऐवजी चक्क गोदापात्रात विसर्जन करण्यात आले. साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जास्तीच्या पावसामुळे यावेळी रावण जाळण्याऐवजी बुडवावा लागणार अशा आशयाचे समाजमाध्यमांवर गाजत असलेले विडंबन गंगाखेडात प्रत्यक्षात उतरल्याचे बघायला मिळाले.
गंगाखेडच्या दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अपप्रवृत्ती पुतळा दहन, आतषबाजी, गुणवंत गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे हे २५ वे वर्षे होते. गोदावरीला आलेल्या महापूरामुळे कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले. परंतू या दुसऱ्या ठिकाणीही पुराचे पाणी घुसले. पुरामुळे शहराची परिस्थितीही गंभीर बनत चालली होती. या सर्व बाबींमुळे सर्व उत्सवी कार्यक्रमांना बगल देत पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याचबरोबर अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन करण्याऐवजी त्याचे गोदावरीत विसर्जन करण्यात आले. गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या हस्ते पुतळा विसर्जित करण्यात आला. जेष्ठ नेते गोपालदास तापडिया, माजी जि, प. सदस्य किशनराव भोसले, तालुका संघाचे मुख्य प्रशासक गंगाधर पवार, संचालक प्रमोद साळवे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव पोले, संचालक आळसे मामा आदिंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संयोजक गोविंद यादव, नागेश पैठणकर, मनोज नाव्हेकर, रमेश औसेकर, गुंडेराव देशपांडे, नंदकुमार भरड, गजानन महाजन, अंबादास राठोड, जुगल तोतला आदिंनी ऊपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास देशमाने, व्यंकटेश यादव, संजय सोनटक्के, किरण यादव, परसराम गिराम, प्रथम यादव, अक्षय मेहत्रे, अथर्व महाजन आदिंसह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis