मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर यंदा मुंबईत वाहन खरेदीचा नवा विक्रम झाला असून, तब्बल १०,५४१ वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ९,०६३ वाहनांची नोंदणी झाली होती. म्हणजेच यंदा तब्बल १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने वाहनांवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी केल्याने वाहनांच्या किंमती कमी झाल्या आणि त्याचा थेट परिणाम खरेदीवर दिसून आला. विशेषत: लहान चारचाकी आणि ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींच्या खरेदीला मोठ्या प्रमाणावर मागणी मिळाली.
मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चार आरटीओ विभागांत मिळून यंदा सर्वाधिक नोंदणी झाली. त्यामध्ये ७,५७९ दुचाकी आणि २,९६२ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. ताडदेव विभागात २,२४३ दुचाकी व ८३५ चारचाकी, वडाळ्यात १,६८७ दुचाकी व ७२३ चारचाकी, अंधेरीत १,२८५ दुचाकी व ५५४ चारचाकी, तर बोरिवलीत २,३६४ दुचाकी व ८५० चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. तर नाशिक शहरात 400 हून अधिक चार चाकी वाहनांची विक्री झाली आहे. सोलापूर शहरात देखील सुमारे 2700 वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये 2000 दुचाकी तर 700 चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे.
यापूर्वी १,२०० सीसी आणि ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या पेट्रोल व सीएनजी चारचाकींवर २८ टक्के जीएसटी आणि १ टक्का सेस मिळून २९ टक्के कर आकारला जात होता, तो आता १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तर ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींवरील करदेखील २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर कमी करण्यात आला. या बदलामुळे वाहनांच्या किमती २० हजारांपासून ते सव्वा लाख रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल नव्या वाहन खरेदीकडे वळला असून, विक्रेत्यांच्या मते लहान गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यंदा ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे विशेषत: विद्युत चारचाकींकडे अधिक असल्याचे परिवहन विभागाने सांगितले. नवरात्रोत्सवापासूनच वाहन खरेदीचा उत्साह वाढला होता आणि दसऱ्याच्या दिवशी तो शिगेला पोहोचला. त्यामुळे यंदाचा दसरा मुंबईकरांसाठी केवळ सणासुदीचा आनंदच नव्हे, तर स्वप्नातील वाहन घेण्याचा सोहळाही ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule