लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या संकटाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकरी पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणारे सहदेव व्होनाळे यांनी नळेगाव येथे 'भीक मागो' आंदोलन केले.
या प्रतिकात्मक आंदोलनात त्यांनी खांद्यावर नांगर घालून शेतकऱ्यांच्या व्यथां मांडल्या. या आंदोलनादरम्यान मिळालेल्या २,०५६ रुपयांचा निधी राज्य सहकारी बँकेत जमा करून 'जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना' कर्जमुक्त करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
सहदेव व्होनाळे हे शेतकरी पुत्र आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांनी पूर्वी शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी करत अहमदपूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी प्रवास केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आणि अन्नत्याग आंदोलनही केले. मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्र शासन व केंद्रीय सहकार विभागाकडून भाजप प्रवेशित नेत्यांच्या मागणीनुसार पैशांचे वाटप होत आहे, पण शेतकऱ्यांच्या सहकारी उद्योगांकडे दुर्लक्ष होत आहे. हा कारखाना कर्जमुक्त करून शेतकऱ्यांना चालवण्यासाठी द्यावा, अन्यथा शेतकरी आणखी संकटात सापडतील, असे व्होनाळे यांनी सांगितले.
आंदोलनात शेतकरी कायद्यांविरोधात, आर्थिक समानता, कामाला समान मोबदला यांसारख्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. खांद्यावर नांगर घेऊन भीक मागण्याच्या या अनोख्या पद्धतीने गावकऱ्यांनी त्यांना दानधर्म केला. यावेळी मनोज वामनराव करवंदे, मोहन नाना जाधव व नामदेव शिंगाडे यांसारखे कार्यकर्ते सहभागी झाले. हे आंदोलन सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे व्होनाळे यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या व कर्जबाजारीपणाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात आहे. शेतकरी कारखान्यांना पुन्हा चालवून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सहकारी बँकेत हा निधी जमा करण्यात येणार आहे. मात्र, सरकारकडून तात्काळ हस्तक्षेपाची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis