दिवंगत रा.सू. गवई स्मारकाचे थाटात उद्घाटन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल, रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या भव्य स्मारकाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याया
दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाचे थाटात उद्घाटन मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती


दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाचे थाटात उद्घाटन मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती


अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल, रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या भव्य स्मारकाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा सोहळा अमरावती येथील मार्डी रस्त्यावर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे उभारण्यात आलेल्या दादासाहेब गवई स्मारक प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, संजय खोडके, सुलभा खोडके, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

भव्य स्मारकातील आकर्षणं

या स्मारकात दादासाहेब गवई यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारे स्मृतीसभागृह, अत्याधुनिक २०० आसनी श्रोतगृह, स्मरणिका दालन, उपहारगृह आणि दृकश्राव्य कियॉस्कची सुविधा आहे. दर्शनी भागात १५ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा प्रवास १६ डिजिटल पोस्टर्स आणि दुर्मिळ छायाचित्रांद्वारे दाखवण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचे भावनिक शब्द

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दादासाहेबांचं स्मारक उभं राहावं, ही सर्वांची इच्छा होती. आज ते सुंदरपणे साकार झालं आहे. मूर्तिकार आणि बांधकाम करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.” त्यांनी सांगितले की, या स्मारकात दादासाहेबांच्या निवडक भाषणांचा आस्वाद घेता येईल आणि यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

फडणवीसांनी आपल्या भाषणात दादासाहेबांशी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले, “त्या काळी सर्व आमदार रेल्वेने मुंबईला जात आणि सगळे दादासाहेबांच्या जेवणाच्या डब्याची वाट पाहत असत कारण तो नेहमीच खास असायचा.”

मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही कौतुक केले. “वकीलकीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अजिबात बदल झाला नाही,” असे त्यांनी नमूद केले.

सोहळ्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र व गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande