
सोलापूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा 2 नोव्हेंबर रोजी असून, या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे तसेच मंदिर समितीने भाविकांना आवश्यक सुविधाबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज, महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, मंदीर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प राणा महाराज वासकर तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाने वारकरी भाविकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचप्रमाणे कार्तिक यात्रेतही चांगल्या सुविधा द्याव्यात. यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट येथील स्वच्छता याची दक्षता घेऊन स्वच्छतेसाठी जास्तीचे स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत. भाविकांना पायी चालत असताना कच खडी दगड लागणार नाहीत याची दक्षता घेऊन भक्ती सागर 65 एकर येथे मुरूम खडी टाकल्यानंतर तात्काळ रोलिंग करून घ्यावे, विशेषता प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात दिंड्या बरोबर वारकरी भाविक अनवाणी चालत प्रदक्षिणा घालतात यावेळी त्यांच्या पायांना कच खडी लागणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
दिंडी सोहळ्यांनी प्रथा परंपरेप्रमाणे टाळ मृदंगाच्या गजरात प्रदक्षिणा पूर्ण करावी. लाऊड स्पीकर वापर करू नये. लाऊड स्पीकर चा वापर केल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. कार्तिकी यात्रा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात दिंड्या पंढरपूरहुन आळंदी कडे रवाना होतात या दिंड्यांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने मार्गावर सुरक्षा व्यवस्था देण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी. कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी 1050 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून सर्व बसेस सुस्थितीत ठेवाव्यात. पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्वच मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तात्काळ बुजवावेत. तसेच पंढरपूर शहरातील खड्डे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ बुजवावेत अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड