संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील राऊत यांचे निधन
पुणे, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, सिंहगड भागाचे संघचालक, तसेच ''कौशिक आश्रम'' संस्थेचे अध्यक्ष, उद्योजक सुनील मधुकरराव राऊत (वय ६९) यांचे गुरुवारी (दि. ३०) पहाटे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
jest


पुणे, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, सिंहगड भागाचे संघचालक, तसेच 'कौशिक आश्रम' संस्थेचे अध्यक्ष, उद्योजक सुनील मधुकरराव राऊत (वय ६९) यांचे गुरुवारी (दि. ३०) पहाटे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई आणि नात असा परिवार आहे.

श्री. राऊत हे १९६४ पासून संघाचे स्वयंसेवक होते. व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या राऊत यांनी काही काळ नोकरी आणि नंतर यशस्वी व्यवसाय केला. त्यानंतर त्यांनी परदेशातही काही वर्षे काम केले. संघाचे तृतीय वर्ष शिक्षित असलेले श्री. राऊत यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तीन वर्षे प्रचारक म्हणून पूर्णवेळ काम केले होते.

पुण्यातील विविध सामाजिक दायित्वांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. संघाच्या सिंहगड भागाचे संघचालक अशी जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याबरोबरच 'कौशिक आश्रम' आणि 'अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान' या संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पहात होते. त्यांनी पर्वती भाग बौद्धिक प्रमुख, पर्वती भाग सहकार्यवाह, सिंहगड भाग समरसता गतीविधी प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. चार वर्षे त्यांनी विवेकानंद नगर संघचालक म्हणूनही काम पाहिले. पुण्यात आयोजित शिवशक्ती संगममध्ये त्यांच्यावर 'सिद्धांत केंद्र प्रमुख' अशी महत्त्वाची जबाबदारी होती.

सुनील राऊत यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संघाचे महानगर संघचालक रवींद्रजी वंजारवाडकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसाद लवळेकर, प्रा. हर्षवर्धन खरे, सेनादत्त सहकारी संस्था आणि नवचैतन्य क्रीडा संघ यांच्या वतीने मुकुंद रणपिसे तसेच राऊत कुटुंबीयांच्या वतीने महेश रोकडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. गेली अनेक वर्षे संघ कार्यातील साऱ्या जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने राऊत यांनी पार पाडल्या, अशा शब्दात वंजारवाडकर यांनी यांनी राऊत यांना श्रद्धांजली अर्पण केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande