
रायगड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। म्हसळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आणि जनसंपर्कशील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची बदली पालघर जिल्ह्यात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ए.पी.आय. रविंद्र अच्युत पारखे यांची म्हसळा पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीप कहाळे यांनी म्हसळा ठाण्यातील केवळ १४ महिन्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, आमली पदार्थांवरील कारवाई, गोवंश तस्करी रोखणे, वाहतूक शिस्त राखणे अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्य जपण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या बदलीनंतर म्हसळ्यातील नागरिक, पत्रकार, विविध संघटना, सामाजिक संस्था आणि सहकारी वर्गाने त्यांना शुभेच्छा देत भावपूर्ण निरोप दिला. अल्प कार्यकाळातच त्यांनी म्हसळेकरांच्या मनात आदर आणि आपुलकीची भावना निर्माण केली असल्याचे सर्वत्र दिसून आले.
बदलीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना कहाळे म्हणाले, “समाजाला सोबत घेऊन चालत असताना कोणतीही अडचण येत नाही. म्हसळ्यातील संस्कृती, एकता आणि लोकांचा आपुलकीचा स्वभाव वेगळाच आहे. इथल्या नागरिकांचे प्रेम व सहकार्य कधीच विसरता येणार नाही. म्हसळ्यातील अनुभव माझ्यासाठी प्रेरणादायी राहील,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या जाण्याने म्हसळा पोलीस ठाण्यात तसेच स्थानिक समाजात एक शून्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके