
कवडगाव येथे ग्रामस्थांशी चर्चा, महिला डाॅक्टरच्या कुटुंबीयांशी संवाद
बीड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
पहिल्या दिवशी क्लीन चीट जाहीर केली, तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल?', असा थेट सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधत विचारला आहे. आज सुषमा अंधारे बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे दाखल झाल्या होत्या.
जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक येथे एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल अंधारे यांनी घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली
आमच्या गावच्या लेकीची बदनामी थांबवून संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत करण्यात यावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण हा लढा जिंकणार आहोत, कुठेही माघार घेणार नाही किंवा कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही, असे आश्वासन अंधारे यांनी ग्रामस्थांना दिले. मात्र, न्यायासाठी लढताना असा जीव धोक्यात घालणारा वेडेपणा करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis