
जेमिमा व हरमनप्रीतच्या वादळी खेळीने ऑस्ट्रेलियावर विजय
नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर (हिं.स.) : भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे! जेमिमा रॉड्रीग्ज व कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने मात करत महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ५० षटकांत ३३८ धावांचा डोंगर उभारला. फिबी लिचीफिल्डने शतक झळकावत ९३ चेंडूत १७ चौकार व ३ षटकारांसह ११९ धावा केल्या. एलिस पेरी (७७), एश्ले गार्डनर (६३) आणि बेथ मुनी (२४) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताकडून श्री चरणी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या, तर क्रांती, अमनज्योत व राधा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात भारताची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. शफाली वर्मा (१०) आणि स्मृती मानधना (२४) लवकर बाद झाल्या. पण त्यानंतर जेमिमा रॉड्रीग्ज व हरमनप्रीत कौर यांनी १६७ धावांची अप्रतिम भागीदारी रचत भारताला स्थैर्य दिले. हरमनप्रीतने ८८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ८९ धावा केल्या.रिचा घोषने १६ चेंडूत २६ धावांची झटपट खेळी करत भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. अखेरीस जेमिमा रॉड्रीग्जने १३४ चेंडूत १४ चौकारांसह नाबाद १२७ धावा करत भारताला ४८.३ षटकांत लक्ष्य गाठून दिले.
या विजयासह टीम इंडिया ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. सामन्यानंतर संपूर्ण संघाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. कारण हा केवळ विजय नव्हता, तर भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची घोषणा होती.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी