“मी तिथे असणार नाही”, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने दिले निवृतीचे संकेत
नवी मुंबई, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार अ‍ॅलिसा हीली हिने भारताविरुद्ध 2025 महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर आपल्या वनडे कारकिर्दीबाबत मोठा संकेत दिला आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की 2029 मध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषका
“मी तिथे असणार नाही”, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार हिलीची एकदिवसीय कारकीर्द संपणार ?


नवी मुंबई, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार अ‍ॅलिसा हीली हिने भारताविरुद्ध 2025 महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर आपल्या वनडे कारकिर्दीबाबत मोठा संकेत दिला आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की 2029 मध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषकात ती खेळणार नाही.

गुरुवारी नवी मुंबईत झालेल्या या मोठ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. हीलीने कबूल केले की संघाकडून काही चुका झाल्या, ज्यामुळे हा सामना हातून निसटला. जेव्हा तिच्याकडे पुढील विश्वचषकाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ती हसत म्हणाली, “मी तिथे असणार नाही!” तिने पुढे सांगितले की पुढील काही वर्षांत संघात बदल दिसतील, तसेच पुढील वर्षी होणारा टी२० विश्वचषक संघासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. हीलीने मान्य केले की तिच्या संघाने या सामन्यात अनेक चांगल्या गोष्टी केल्या, पण शेवटी ते हरले. ती म्हणाली, “आम्ही या पराभवातून शिकू आणि पुढे जाऊ.”

2029 मध्ये हीलीचे वय ३९ वर्षे होईल. तिच्या दुखापतीच्या इतिहासाचा आणि खेळाच्या वाढत्या तीव्रतेचा विचार करता, ती पुढील काही वर्षांत क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सामन्यानंतर हीली म्हणाली, “शेवटी हा एक चांगला सामना झाला. आता जेव्हा मी याचा विचार करते, तेव्हा वाटते की हा पराभव आपण स्वतःलाच दिला. कदाचित ही पहिली वेळ आहे, जेव्हा मला असे वाटत आहे.”

तिने सांगितले, “आपण फलंदाजीत शेवटी चांगले काम करू शकलो नाही, गोलंदाजीही फारशी प्रभावी नव्हती आणि क्षेत्ररक्षणात कॅचेस देखील सुटले. शेवटी, आपण हरलोच.” हीलीने पुढे सांगितले, “मला वाटते की संपूर्ण स्पर्धेत प्रत्येकाने उत्कृष्ट योगदान दिले. म्हणूनच येथे पराभूत कर्णधार म्हणून उभे राहणे निराशाजनक वाटते.” तिने सांगितले की संघाने संधी निर्माण केल्या, दडपण आणले, परिस्थिती घडवली, पण त्यांचा योग्य फायदा घेण्यात अपयश आले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत 338 धावांचा मोठा स्कोर उभारला, पण संघाने केलेल्या उत्तम सुरुवातीच्या तुलनेत तो स्कोर नंतर अपुरा वाटला. भारताच्या दुसऱ्या डावात, अनेक फील्डरकडून सोपे झेल सुटले, ज्यात हीलीचा देखील समावेश होता. चांगले गोलंदाजी आक्रमण असूनही संघ सतत दडपण टिकवण्यात अपयशी ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande