
नवी दिल्ली , 31 ऑक्टोबर (हिं.स.)।भारत आणि अमेरिकेदरम्यान 10 वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. दोन्ही देशांमधील संबंधांसाठी हा करार महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी करारानंतर सांगितले की, “भारत आणि अमेरिकेतील संरक्षण संबंध यापूर्वी इतके मजबूत कधीच नव्हते.” त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की त्यांची भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी भेट झाली आणि या भेटीत संरक्षण सहकार्याचा दीर्घकालीन करार करण्यात आला. हेगसेथ यांच्या मते, भारत आणि अमेरिकेमधील हा करार प्रादेशिक स्थैर्य अधिक मजबूत करेल.
या कराराबद्दल भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, “माझ्या मते, आज या संरक्षण आराखडा करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होईल.”
यापूर्वी, राजनाथ सिंह यांची ऑगस्ट महिन्यात वॉशिंग्टनमध्ये हेगसेथ यांच्याशी भेटण्याची योजना होती, परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवरील शुल्क दुप्पट करून ५०% केले आणि त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध गेल्या अनेक दशकांतील सर्वात खालच्या पातळीवर गेले. यामुळे राजनाथ सिंह यांचा अमेरिकेचा दौरा रद्द करण्यात आला होता. आता आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी राजनाथ सिंह क्वालालंपूर येथे गेले, जिथे त्यांची आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांची भेट झाली व या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
याआधी भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही क्वालालंपूरमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली होती. त्या भेटीतदेखील दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली होती.
मागील आठवड्यात अमेरिकेने रशियाच्या दोन प्रमुख कच्चे तेल निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले होते. त्यानंतर भारतीय रिफायनऱ्यांनी रशियन तेलाच्या आयातीत कपात केली आहे, आणि त्यामुळे आता दोन्ही देश संबंधांच्या पुनर्बांधणीच्या शक्यता पाहत आहेत.
अलीकडेच दक्षिण कोरियाच्या दौर्यावर असताना ट्रम्प यांनीही म्हटले होते की त्यांना भारतासोबत एक व्यापार करार करायचा आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगले राहिले असले तरी शुल्क विवाद आणि रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीच्या मुद्द्यावरून काही प्रमाणात तणाव निर्माण झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode