
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
कुंभमेळा २०२७ च्या निमित्त जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर , बेरुळ, पैठण व आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखडा तयार करतांना आपल्या जिल्ह्यात शाश्वत सुविधांचा विकास व्हावा व पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याचे देशभरात नाव होऊन लौकीक वाढवावा, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे दिले.
छत्रपती संभाजीनगर, वेरुळ, पैठण व आपेगाव कुंभमेळा २०२७ विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, विधानसभा सदस्य आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्त लाखो भाविक, पर्यटक, साधुसंत हे महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. त्यात जिल्ह्यातील वेरुळ आणि पैठण हे स्थळ महत्त्वाचे आहे. अंदाजे एक कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत येतील असा अंदाज घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यात प्रामुख्याने परिवहन व वाहतूक व्यवस्था, मुलभूत सुविधा, भाविक पर्यटकांची सोय व राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक स्थळांचे जतन या महत्त्वाच्या बाबी विचाराधीन करुन सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis