
कोल्हापूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची या गावातील स्मशान भूमीत मध्यरात्री एका मांत्रीकाचा अंधश्रद्धा वाढवणारे कृत्य पुढे आलेय. लिंबू, बाटली, सह थेट स्मशान भूमीतील प्रेत जाळण्यासाठी ठेवलेल्या लोखंडी दाहिनीत बसून काहीजणांची नावे घेत मंत्र म्हणत लिंबू फिरवून बाटलीत घालत असलेला मराठी, कानडी भाषेत आपल्या सहकाऱ्यांशी बोलत असलेला व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल झाला आणि गावासह संपूर्ण जिल्हयातच खळबळ माजली.
अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा अस्तित्वात असताना आणि राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामित्व मानणाऱ्या कोल्हापूर जिल्हयात उघडपणे झालेल्या अघोरी प्रकाराने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. शिरोली गावातील स्मशान भूमी गावा बाहेर पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर आहे. या स्मशान भूमीत या पूर्वीही अज्ञातानी काही राजकीय व्यक्तीच्या कुटुंबियाना लक्ष्य करून करणीचे प्रकार केल्याचे उघड झाले होते. तसेच भर रस्त्यावर, भरचौकात ठिकठिकाणी लिंबू, मिरच्या हळदी कुंकु गुलाल परडी आदी साहित्यांचे पडलेले उतारे याभागात अंधश्रद्धा वाढीस लागल्याचे द्योतक बनले आहे. जनजागृतीसह कायद्याचा बडगा हाच त्यावर उपाय आहे. त्याबाबत पोलिस, शासन, आणि सामाजिक कार्यकर्त्यांत उदासिनता दिसून येत आहे.
शिरोलीतील स्मशान भूमित प्रकार करणारा इसम व्हिडीओत स्पष्ट दिसतो, संभाषण, त्यातील नावेही स्पष्ट होतात सदर इसमावर यापूर्वी गुप्तधन प्रकरणात दोन वर्षापूर्वी कारवाईही झाली होती. तरीही त्याने पुन्हा असा प्रकार उघडपणे करून त्याचा व्हिडीओ आपल्याच सहकऱ्यांकडून करून घ्यावा या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अनिसचे राज्य सचिव कॉ. गिरीश फोंडे यांनी या प्रकरणात सहभागी सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक पत्रही दिले आहे. स. पो. नि. सुनिल गायकवाड यांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली असून गुन्हाही दाखल करण्यात येईल असे सांगीतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar