उद्धव यांच्या भाषणातून ‘विकृत मानसिकतेचे प्रदर्शन’ - बावनकुळे
मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे, ‘विकृत मानसिकतेचे प्रदर्शन’, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुंबईत पत्रकारांना त्यांनी सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत पराभव आणि येणाऱ्या निवडणुकीत विजया
उद्धव यांच्या भाषणातून ‘विकृत मानसिकतेचे प्रदर्शन’ - बावनकुळे


मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे, ‘विकृत मानसिकतेचे प्रदर्शन’, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

मुंबईत पत्रकारांना त्यांनी सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत पराभव आणि येणाऱ्या निवडणुकीत विजयाची चिन्हे नसल्याने ठाकरे यांची मानसिकता विकृतीकडे गेली आहे. ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह भाजपासह महायुतीची घौडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत आत्मविश्वासाने काम करायला हवे, शिवीगाळ आणि अपमानाने राजकारणात मोठे होता येत नाही.”

मुंबईच्या नाइट लाईफवरून उध्दव ठाकरे यांनी भाषणातून बावनकुळे यांच्या कौटुंबिक मकाऊ प्रवासाचा उल्लेख केला होता. यावर बावनकुळे म्हणाले, “परदेशात कुटुंबासह कोणीही नाईट लाइफचा अनुभव घेत नाही. आदित्य ठाकरे स्कॉटलंडला गेले, तेव्हा किंवा उद्धव ठाकरे लंडनला जातात तेव्हा ते कुटुंबाला बाजूला ठेवून नाईट लाइफला जातात का? हे त्यांनाच माहिती.” आम्ही मकाऊला संपूर्ण कुटुंबासह गेलो होतो. कुटुंबासह फोटो मॉर्फ करून चुकीच्या पद्धतीने पसरवले गेले.

आदिवासींच्या जमिनी सरकार हडपण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, “आदिवासी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, त्यांच्या पडीक जमिनी भाड्याने देऊन उत्पन्न मिळवण्याची परवानगी देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा करार जिल्हाधिकाऱ्यांसमोर नोंदणीकृत होईल, आणि आदिवासींचा कोणताही हक्क डावलला जाणार नाही. जमीन त्यांच्या नावावरच राहील.”

“काँग्रेसकडून सावरकरांचा अपमान होत असताना ठाकरे यांचे मौन केवळ मतांच्या लाचारीतून आहे. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही.” त्यांनी ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका न केल्याचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, ठाकरे यांनी राहुल गांधींचा अजेंडा स्वीकारला आहे. बावनकुळे यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधत म्हटले, “राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, तर पंतप्रधान मोदींनी जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावले आहे. त्यांना भारत आवडत नसेल तर त्यांनी इटलीला जावे.”

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार कापून मदत केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचे समाधान होईल असा निर्णय घेतील,” अशी ग्वाही त्यांनी दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “मुंबईतील गरीबांना घरे मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. धारावी प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना पोटदुखी होत आहे, म्हणून ते द्वेषातून टीका करतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande