अहमदाबाद, 4 ऑक्टोबर (हिं.स.)रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४० धावांनी पराभव केला. भारताने दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी आपला पहिला डाव ५ बाद ४४८ धावांवर घोषित केला आणि २८६ धावांची आघाडी घेतली. वेस्ट इंडिजचा संघ दोन पूर्ण सत्रे फलंदाजी करू शकला नाही आणि दुसऱ्या डावात १४६ धावांवर सर्वबाद झाला. अशा प्रकारे भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतासाठी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने या सामन्यात आपल्या फिरकी गोलंदाजीने कमाल केली. पहिल्या डावात जडेजाने नाबाद शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात चार विकेट्सही घेतल्या. सिराजने जडेजाला साथ देत तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेण्यात यश आलं. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता आली नाही.
या सामन्यात दोन्ही डावात वेस्ट इंडिजची फलंदाजी खराब होती आणि तिन्ही दिवस भारतीय संघाने या कसोटीवर आपले वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजसाठी दुसऱ्या डावात अलिका अथानाझेने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर जस्टिन ग्रीव्हजने २५, जेडेन सील्सने २२, जोहान लेनने १४, जॉन कॅम्पबेलने १४, तेगनारायण चंद्रपॉलने ८, ब्रँडन किंगने ५, रोस्टन चेसने १ आणि शाई होपने १ धाव केली. या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे