मुंब्र्यात घडविणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू - अजिंक्य नाईक
ठाणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मुंब्रा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडून पाच एकरचा भूखंड एमसीएला देण्यात आला असून लवकरच अकादमी उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-श
मुंब्र्यात घडविणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू - अजिंक्य नाईक


ठाणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मुंब्रा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडून पाच एकरचा भूखंड एमसीएला देण्यात आला असून लवकरच अकादमी उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपुजन करण्यात येईल, अशी माहिती डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डाॅ.जितेंद्र आव्हाड, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, ठाणे स्पोर्ट्स क्लबचे सरचिटणीस विकास रेपाळे, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा - मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी ठामपा आयुक्त सौरभ राव यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि अजिंक्य नाईक यांनी ही माहिती दिली.

डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासून ठाण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनची अकादमी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करीत होतो. आता हे प्रयत्न फलद्रूप झाले आहेत. मुंब्रा येथील पाच एकरच्या भूखंडावर क्रिकेट अकादमी उभारण्याचा प्रस्ताव आपण आयुक्तांकडे मांडला होता. हा प्रस्ताव ठाणे पालिका आयुक्तांनी मान्य केल्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या प्रस्तावाला लागलीच मान्यता दिली. हा भूखंड एमसीएला मोफत मिळालेला नाही. या भूखंडाचे भाडे जवळपास 7.5 कोटी असून रजिस्ट्रेशनसाठी एमसीएने 40 लाख अदा केल्यानंतर हा भूखंड एमसीएकडे आला आहे. लवकरच येथे अकादमीची उभारणी करण्यात येणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी, ठाण्यासारख्या ठिकाणी क्रिकेट अकादमी असावी, अशी आमची इच्छा होती. जेणेकरून ठाणे, मुंब्रा, कल्याण, अंबरनाथ आदी भागातील क्रिकेटपटूंना हक्काचे आणि जवळच प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होईल. ही क्रिकेट अकादमी संपूर्ण मोफत असणार आहे. येथे एमसीए नवनवीन खेळाडू मोफत घडविणार आहे. ड्रेसिंग रूम, स्विमिंग पूल, जीम, टेनीस क्रिकेटसाठी स्वतंत्र दालन आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. वानखेडे स्टेडियमप्रमाणेच ही वास्तू असणार आहे. मुंब्रा येथील यासीन शेख हा तरूण रणजी क्रिकेटमध्ये अंडर 19 मध्ये मुंबईचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्याप्रमाणेच येथून अनेक क्रिकेटपटू घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन हे चॅरिटेबल ट्रस्ट असल्याने हे सर्व प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, विकास रेपाळे यांनी, यामुळे टेनीस क्रिकेटला जागा मिळणार नाही, असे राजकारण केले जात असेल तर ते चुकीचे आहे. ठाण्यात एवढी मोठी वास्तू उभी राहते, हे स्पृहणीय आहे. आपल्या शहरातून आता नवनवीन खेळाडू निर्माण होतील, याचे कौतूकच करायला हवे, असे म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande