कोलंबो, 4 ऑक्टोबर (हिं.स.) भारत आणि पाकिस्तानच्या संघात आशिया कपमध्ये क्रिकेटप्रेमींनी अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या पाहिल्या. मागील तीन रविवारांप्रमाणे, भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ चौथ्या रविवारी एकमेकांसमोर येणार आहे. पण यावेळी हा सामना पुरुष संघांऐवजी महिला संघांमध्ये असेल. हा एकदिवसीय विश्वचषक सामना मैदानावरील क्रिकेटच्या लढाईपेक्षा भावनांची लढाई असणार आहे.
भारत आणि पाकिस्तानने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपात २७ सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने २४ आणि पाकिस्तानने तीन जिंकले आहेत. पाकिस्तानचे तीनही विजय टी-२० स्वरूपात आले आहेत. भारताचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००% विक्रम आहे. दोन्ही संघांमध्ये खेळलेले सर्व ११ सामने जिंकण्याचा त्यांचा विक्रम आहे. दोन्ही संघ विश्वचषकात चार वेळा आमनेसामने आले आहेत. चारही वेळा भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला, तर पाकिस्तानचा बांगलादेशकडून 7 विकेट्सने पराभव झाला. पाकिस्तानी फलंदाज फिरकी आणि वेगवान गोलंदाजी दोन्हीचा सामना करू शकले नाहीत.
सर्व संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे आणि भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतीय संघ आता त्यांचा नेट रन रेट सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. जो स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात महत्त्वाचा ठरतो. हरमनप्रीत कौरची टीम या सामन्यात पूर्ण आत्मविश्वासाने प्रवेश करेल. पहिल्या सामन्यात १२४ धावांत सहा विकेट्स गमावल्यानंतर तळाच्या मधल्या फळीने शानदार कामगिरी केली आणि ४७ षटकांत २५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले. भारताची ताकद त्याची फलंदाजी आहे. पण अधिक मजबूत संघांविरुद्ध फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.
बांगलादेश-पाकिस्तान सामन्यात कोलंबोच्या खेळपट्टीवर बरीच सीम होती. त्यामुळे भारत गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत दुखापतीतून परतलेल्या वेगवान गोलंदाज रेणुका सिंगला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण सराव सत्रादरम्यान ती लयीत दिसली नाही. दुसरीकडे पाकिस्तानल आपल्या फलंदाजीची चिंता सतावत आहे. पहिल्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली आणि डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. फातिमा सना आणि डायना बेग यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पाकिस्तानला सर्व सामने एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार आहे. पण भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्यांना जिंकण्यासाठी चमत्कार करावा लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे