पालघर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजावर ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या दबावाखाली खोटे गुन्हे दाखल होत असून, जिल्ह्यात अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थना स्थळे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी ‘आदिवासी संस्कृती बचाव मोर्चा व ठिय्या आंदोलन’ आयोजित करण्यात येणार आहे.
या संदर्भात शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी संघटनेतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक यतीन देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले.
संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ ऑक्टोबर रोजी विक्रमगड तालुक्यातील वेढे येथील गणेश पांडुरंग दुमाडा व इतर १३ जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच अशाच प्रकारचे खोटे गुन्हे मोडगाव, नवी दापचरी, कासा, जामशेत, बांधन, आंबिस्ते आदी गावांमध्ये नोंदवले गेले असून, संस्कृती रक्षणासाठी काम करणाऱ्या आदिवासी बांधवांना प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला.
निवेदन देताना संघटनेचे कार्यकर्ते तसेच वेढे, नवी दापचरी, सावरखंड, बांधण, मनोर, सफाले, धुकटन, धांगडपाडा, नंदोरे, कोंढाण, टाकवाल आदी गावांतील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
निवेदनात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत –
१) आदिवासी बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
२) भविष्यात असे गुन्हे नोंदवले जाणार नाहीत, याची खात्री प्रशासनाने द्यावी.
३) जिल्ह्यातील सुमारे २०० अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थना स्थळांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL