ठाणे, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। जगभरात ७२ देशात मराठी भाषा बोलली जाते. भारतात ती सर्वत्र प्रचलित आहे. त्यामुळे या भाषेत आर्थिक व्यवहारही होतात. त्यामुळेच मराठीशी निगडित विविध क्षेत्रात उत्तम व्यवसायाच्या संधी आहेत. आपली अभिजात मराठी भाषा ही उदरनिर्वाहाचेही साधन आहे. त्याबाबत कोणताही गैरसमज बाळगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांनी केले.
मराठी भाषेस ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यानिमित्ताने ०३ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ठाणे महापालिकेतर्फेही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा आरंभ शुक्रवारी सकाळी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह विचारमंथन व्याख्यानमालेच्या १७व्या पुष्पाने करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांनी 'मराठी भाषेचे अभिजातपण' या विषयावर व्याख्यान दिले. त्याप्रसंगी, उपायुक्त उमेश बिरारी, अग्निशमन दल प्रमुख गिरीश झळके, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे, उप वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता हमरसकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर आदी उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा आता मिळाला असला तरी ती भाषा मुळातच अभिजात आहे. पिढयानपिढया भाषा चालत आलेली आहे. लीळाचरित्र ग्रंथ् हे भाषेचे भूषण आहे. भाषा हे संदेशवहनाचे साधन असते, त्याचसोबत, समाजाची संस्कृती हा भाषेचा आत्मा असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळूसकर यांनी सांगितले. सुमारे २५०० वर्षापासून मराठी भाषा अस्तित्वात आहे. त्यामुळे मराठी ही मुळातच अभिजात आहे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी भाषा ही दोन हजार वर्षाहून प्राचीन हवी, सलगता, मौलिकता, अखंडता हे निकष पूर्ण करणारी हवी, तसेच, प्राचीन भाषा आधुनिक भाषा व्याकरणावर आधारीत असावी असे काही निकष होते. हे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत असल्याने ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाला असल्याचे डॉ. केळूसकर यांनी नमूद केले. हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे देशातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठीच्या अध्ययन आणि अध्यापनासाठी निधी उपलब्ध होईल, प्राचीन ग्रंथाच्या अनुवादासाठी निधी उपलब्ध होईल, भाषा अध्ययन केंद्र स्थापन होईल. त्यातून मोठ्या प्रमाणावर भाषेचे विस्तारीकरण होण्यास मदत होईल, असेही केळुसकर म्हणाले.
मराठी भाषा ही भावना व्यक्त करते. भाषा प्रत्येकाला कार्यशील व कार्यप्रवृत्त् करत असते. मराठी भाषेचे काय होणार याची चिंता करण्याची गरज नाही. या भाषेत दरवर्षी सुमारे २००० पुस्तकांची निर्मिती होते, सुमारे ५०० दिवाळी अंक दरवर्षी निघतात. भाषा ही उदरनिर्वाहाचेही साधन आहे. मराठी भाषेतील अर्थव्यवहार देखील मोठा आहे. अस्खलित मराठी भाषा बोलणाऱ्यांना मरण नाही. अनुवाद, निवेदन, सूत्रसंचालन यासोबतच, वाहिन्यांनाही व्यवस्थित मराठीत बोलणाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे मराठीत शिकूया, लिहूया आणि वाचूया याचा आग्रह आपण धरला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्याख्यानाची सांगता डॉ. केळुसकर यांनी काव्यवाचनाने केली.
*शालेय स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, कार्यशाळा*
प्रास्ताविकपर भाषणात, उपायुक्त उमेश बिरारी यांनी या सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेतील कार्यक्रमांची माहिती दिली. या सप्ताहाच्या काळात महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, गद्य आणि पद्य वाचन स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्याबरोबर, शालेय स्तरावर पुस्तक प्रदर्शने, ग्रंथालय भेटी हेही कार्यक्रम होणार आहेत. महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सोपी आणि सुटसुटीत कार्यालयीन मराठी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रख्यात व्याख्यात्या डॉ. धनश्री लेले त्यात
मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, ०७ आणि ०८ ऑक्टोबर रोजी महापालिका मुख्यालय येथे ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री यांचेही आयोजन करण्यात आले असल्याचेही बिरारी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर