नामसाधर्म्याचा गोंधळ', 13 संशयित ठरले निर्दोष अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : गेल्या 2 ऑक्टोबर रोजी परतवाडा शहरात पोलिसांनी घेतलेल्या धाडसत्रानंतर मोठी खळबळ उडाली होती. मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती ग्रामीण आणि नागपूर गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत 13 जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, तपासाअंती सर्वजण निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलिसांना हवा असलेला कुख्यात आरोपी परतवाड्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ब्राह्मण सभागृह कॉलनी आणि कश्यप पेट्रोल पंप परिसरात कारवाई केली. आरोपीकडे शस्त्र असल्याची शक्यता लक्षात घेता सावधगिरीने रात्री 10.30 वाजता छापा टाकण्यात आला. संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी हवेत एक वार्निंग शॉट फायर केला होता. तपासादरम्यान समोर आले की, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक तरुणाचा आणि मूळ आरोपीचा केवळ 'अंकित राणा' हे नाव समान होते. चौकशीदरम्यान कोणत्याही संशयिताचा कुठल्याही गँगशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सर्व 13 जणांची सुटका करण्यात आली. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत, सार्वजनिक सुरक्षेसाठी अशा माहितीची तत्काळ तपासणी करून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी