सोलापूर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)।
पाशांकुशा एकादशीनिमित्त शुक्रवारी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. चंद्रभागा घाट, वाळवंट, मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग भाविकांनी फुलून गेले. दिवसभर दोन लाखांवर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शन रांग 3 किलोमीटरपर्यंत गेली. दर्शन रांगेतील भाविकांना मूलभूत सेवा सुविधा मंदिर समितीकडून पुरवण्यात येत आहेत.
चंद्रभागा नदी पात्रात उजनी व वीर धरणांतून मुबलक पाणी सोडल्यामुळे एकादशीला आलेल्या भाविकांनी दिवसभर स्नानाचा आनंद घेतला. चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी पदस्पर्श, मुख दर्शन व कळस दर्शनास प्राधान्य दिले.
भाविकांच्या वाहनांमुळे शहरातील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले. गजानन महाराज मठालगत वाहनतळ फुल्ल झाल्याने बहुतांश वाहने रस्त्याच्या बाजूला दुतर्फा लावली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थ हे व्हीआयपी वाहनांसाठी पार्किंग म्हणून आषाढी यात्रेपासून उपयोगात आणले जात आहे. परंतु, येथे ठिकाणावर हातगाडे, स्टॉलधारकांनी दुकाने लावल्याने वाहने पार्किंग करता आली नाहीत. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत होती. शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडली. मात्र, वाहतुक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड