कोलकाता, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झाले असून आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने दार्जिलिंग, सिक्किम आणि उत्तर बंगालचा मोठा भाग विस्कळीत झाला आहे. दार्जिलिंग आणि सिक्कीममधील अनेक पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
दार्जिलिंग आणि सिक्किमला जोडणारा एक महत्त्वाचा पूल मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील संपर्क पूर्णपणे तुटला असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सिलीगुडी, जलपाईगुडी आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग १० वर वाहतूक ठप्प झाली आहे. चित्रे, सेल्फी दारा आणि इतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती घसरल्याने रस्ता बंद झाला आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग ७१७ए वरही भूस्खलन झाल्याची नोंद आहे. तीस्ता बाजार परिसरात पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढली असून कलिम्पोंग ते दार्जिलिंग हा मार्ग बंद करण्यात आला आहे. कोरोनेशन ब्रिज कोसळल्यामुळे सिक्किम आणि दार्जिलिंगमधील जोडणारा मुख्य मार्गही बंद झाला आहे.
स्थानिक पोलिसांनी नागरिकांना कलिम्पोंग जिल्ह्यातून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कुर्सेओंग भागातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिषेक रॉय यांनी सांगितले की, सध्या सात मृतदेह बाहेर काढले गेले आहेत, तर आणखी दोन जणांचा शोध घेतला जात आहे. दिलाराम आणि रोहिणी रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. पनकहबरी रस्त्याची स्थिती अत्यंत खराब आहे. पर्यटकांना तिनधरिया मार्गाने जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दार्जिलिंग आणि सिक्किममधील अनेक पर्यटनस्थळे सध्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत. तीव्र पावसामुळे हॉटेल्स आणि होमस्टे भागांमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर लिहिले की, “उत्तर बंगालमध्ये अतिवृष्टीमुळे दार्जिलिंग, कलिम्पोंग आणि कुर्सेओंग भाग अत्यंत प्रभावित झाले आहेत. भूस्खलन आणि पुरामुळे सिलीगुडी, तराई आणि दुआर्स भागाचा संपर्क तुटला आहे.”
भारतीय हवामान खात्याने दार्जिलिंग, सिक्किम आणि आसपासच्या पर्वतीय भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, ७ ऑक्टोबरपर्यंत सिक्किम आणि पश्चिम बंगालच्या पर्वतीय भागात हवामान अत्यंत प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. भूटानमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथे फ्लॅश फ्लड्स निर्माण होऊ शकतात, ज्याचा थेट परिणाम पश्चिम बंगालच्या डोंगरी पट्ट्यावर होईल.
या आपत्तीमुळे संपूर्ण उत्तर बंगाल हादरला असून बचाव पथकं आणि स्थानिक प्रशासन मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू ठेवत आहेत. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टायगर हिल आणि रॉक गार्डनसह सर्व पर्यटन स्थळे बंद आहेत. हवामान अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की भूतानमधील परिस्थिती बिघडल्याने उत्तर बंगालमध्ये अचानक पूर येऊ शकतो. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे, गोरखालँड टेरिटोरियल ॲडमिनिस्ट्रेशनने टायगर हिल आणि रॉक गार्डनसह दार्जिलिंगमधील पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दार्जिलिंग टॉय ट्रेन सेवा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. बचाव आणि मदत कार्य सुरू असताना अधिकारी रहिवाशांना आणि प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आणि रस्ते आणि हवामान परिस्थितीबद्दल अपडेट राहण्याचे आवाहन करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule