* दिल्लीत रायगडच्या लष्करी वारशावर फलदायी चर्चा
नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी भारताची सर्वात जुनी लष्करी थिंक-टॅंक संस्था म्हणून ओळखली जाणारी युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्युशन ऑफ इंडिया (United Service Institution of India – USI) यांच्या सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी (CMHCS) या विभागाच्या संचालकांशी नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान संभाजीराजे छत्रपती यांना येत्या १४ व १५ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या ‘इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले.
१८७० साली स्थापन झालेली USI ही संस्था देशातील लष्करी विचारवंत, संशोधक आणि इतिहासकारांसाठी एक नामांकित मंच मानली जाते. लष्करी सेवांमध्ये कला, विज्ञान आणि साहित्य या क्षेत्रांतील ज्ञानवृद्धीसाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. थलसेना, नौदल आणि वायुदलप्रमुख हे या संस्थेचे उपसंरक्षक असून Chief of Integrated Defence Staff (CISC) हे USI परिषदेचे अध्यक्ष आहेत.
या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय लष्करी व सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने रायगड विकास प्राधिकरण आणि सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी यांच्यात पुढील काळात संयुक्तरीत्या काम करण्याबाबत सखोल चर्चा झाली.
विशेषत: दुर्गराज रायगड व परिसरातील ऐतिहासिक लष्करी वारसा व्यवस्थापन धोरण, पर्यटन विकास व शाश्वतता, जैवविविधता संरक्षण, पर्यटन अर्थशास्त्र, तसेच स्थानिक रोजगार निर्मिती अशा विविध अंगांनी दोन्ही संस्था एकत्रितरीत्या कार्य करु शकतात, याबाबत चर्चा झाली.
या प्रसंगी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा लष्करी वारसा हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे. रायगडसारख्या ऐतिहासिक दुर्गांचे संवर्धन करताना त्या मागील लष्करी तत्त्वज्ञान, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक पैलूंचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. भारताची लष्करी थिंक टँक असलेल्या USI आणि CMHCS यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने रायगडचा वारसा अभ्यासपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडता येईल.”
या बैठकीला रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्यासह प्राधिकरणाचे तज्ञ सल्लागार श्री. ए. के. सिन्हा, श्री. रामनाथन, तसेच वास्तू संवर्धक श्री. वरुण भामरे उपस्थित होते.
USI तर्फे सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीचे संचालक स्क्वॉड्रन लीडर राणा टी एस चिन्ना आणि वरिष्ठ सल्लागार डॉ अर्चना त्यागी उपस्थित होते.
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रायगड विकास प्राधिकरण आणि CMHCS यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी काळात रायगडच्या लष्करी वारसा संवर्धन, प्रशिक्षण, संशोधन आणि पर्यटन व्यवस्थापनासाठी एकात्मिक प्रकल्प राबविण्याची दिशा ठरविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी