मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। मान्सूननंतर अरबी समुद्रात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ ‘शक्ती’ आता तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ गुजरातमधील द्वारकापासून सुमारे ४२० किलोमीटर अंतरावर समुद्रात सक्रिय असून, त्यात ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. पुढील २४ तासांत ‘शक्ती’ वादळ पश्चिम-नैऋत्येकडे सरकून वायव्य आणि मध्य अरबी समुद्रात पोहोचेल, त्यानंतर सोमवारपासून ते हळूहळू कमकुवत होऊन ईशान्येकडे वळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रात सध्या १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने मच्छिमारांना ७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
‘शक्ती’ वादळामुळे गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यांवर समुद्र खवळण्याची शक्यता असून, त्याचे परिणाम हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनांना नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्पर ठेवण्याचे, सखल व किनारी भागातील नागरिकांना आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि सतर्कता पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा विभागात, ७ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर कोकणातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासनाने सज्जता ठेवली आहे.
उत्तर भारतातही हवामानात बदल दिसून येत आहे. राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला असून, अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्याने हवामानातील बदल तीव्र होत आहे. बिहारमधील १० जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला गेला आहे, तर पाटणा आणि अन्य पाच जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट लागू आहे. सतत तीन दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशातही परतीच्या मान्सूनमुळे २७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान राज्यात २८.६ मिमी पाऊस नोंदवला गेला असून, ५ ऑक्टोबरपासून नव्या पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. हरियाणामध्ये आजपासून तीन दिवस पुन्हा पावसाची शक्यता असून, ८ ऑक्टोबरनंतर वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमानात घट होईल.
पंजाबमध्ये अमृतसर, जालंधर, फरीदकोट आणि मोहाली येथे पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा, तर १३ जिल्ह्यांना पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. रावी, बियास आणि सतलज नद्यांवरील पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
दरम्यान, मध्यप्रदेशातही मान्सून परतीच्या टप्प्यात असून, १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पूर्णपणे निघून जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांत अजून रिमझिम आणि हलका पाऊस सुरू राहील. जर प्रणाली मजबूत राहिली, तर काही भागांत पुन्हा मुसळधार पावसाचा अनुभव येऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule