कोलकाता, ६ ऑक्टोबर (हिं.स.): उत्तर बंगालमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे झालेल्या मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी मदत जाहीर केली आहे. त्यांनी मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला राज्य सरकारकडून ५ लाख रुपये भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला होमगार्डची नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
उत्तर बंगालमधील पूर आणि भूस्खलनग्रस्त भागांना भेट देण्यापूर्वी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला माहित आहे की पैशाने जीवाची भरपाई होऊ शकत नाही. पण संकटात सापडलेल्या लोकांसोबत उभे राहण्याची सरकारची सामाजिक जबाबदारी आहे. म्हणूनच, भविष्यात बाधित कुटुंबांना इतरांवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून ही भरपाई आणि नोकरीची मदत दिली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, शेजारच्या भूतानमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे उत्तर बंगालमधील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांनी आपत्तीचे वर्णन मानवनिर्मित असे केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या मते, दक्षिण बंगालमधील दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन धरणांमधून पाणी सोडल्याने ज्याप्रमाणे पूर परिस्थिती निर्माण झाली. त्याचप्रमाणे भूतानमधून पाणी सोडल्याने उत्तर बंगालमध्ये संकट निर्माण झाले.
भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर टीका केली आहे. ते म्हणाले की, आपत्तींच्या वेळी जबाबदारी टाळण्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच दोषारोपाचा खेळ खेळतात. दक्षिण बंगालमध्ये त्या डीव्हीसीला दोष देतात आणि उत्तर बंगालमध्ये त्या भूतानला दोष देतात. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, यावेळी प्राधान्य नागरिकांना मदत करणे आहे तर दोषारोपाच्या खेळात सहभागी होणे नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे