अमरावती महानगराचा विजयादशमी उत्सव
अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. राष्ट्र आणि हिंदुत्वाला सर्वसंपन्न करण्यासाठी संघ १०० वर्षापासून निस्वार्थपणे अविरत कार्यरत आहे. हिंदुत्व व आध्यात्माने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतीयांना एकासूत्रात बांधले आहे. हिंदुत्व व आध्यात्म हीच भारताची जगभर ओळख आहे. भारत हिंदू राष्ट्र होते आणि राहील, असे उद्बोधन रा. स्व. संघ अ. भा. कार्यकारिणी सदस्य व प्रज्ञा प्रवाहाचे अ. भा. संयोजक जे. नंदकुमार यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमरावती महानगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रम रविवारी सायंकाळी स्थानिक श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजिण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष व विपश्यना आचार्य डॉ. कमलताई गवई होत्या. अपरिहार्य कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांनी आपल्या भावना शुभेच्छा संदेशातून व्यक्त केल्या. यावेळी विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महानगर संघचालक उल्हास बपोरीकर व्यासपीठावर होते.
जे. नंदकुमार पुढे म्हणाले, भारतीय संघटीत नव्हते म्हणून परकीय शक्तींनी आपल्यावर राज्य केले. जेव्हा आपण संघटीत व्हायला लागलो, तेव्हा स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात विशेष योगदान असल्याचे सांगून त्यांनी चिमूर व आष्टी येथील संग्रामाला उजाळा दिला. भारतीयांना मिळालेले स्वातंत्र्य कायम टिकावे यासाठी संघ व्यक्ती निर्माणाचे कार्य अविरतपणे करीत आहे. संघाचे सामाजिक समरसता, स्वदेशी, नागरिक कर्तव्य, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन या पंचपरिवर्तनावर कार्य सुरू आहे. समाजातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सशक्त व समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी ते उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृतवचन श्रीराम बालेकर, वैयक्तीक गीत मधुसूदन वटक, सांघिक गीत नितीन गोंधळेकर, प्रार्थना संदीप परांजपे यांनी सादर केली. उत्सवाचे मुख्य शिक्षक विवेक धर्माळे होते. मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण व त्यानंतर अतिथीच्याहस्ते शस्त्रपूजन झाले. स्वयंसेवकांनी प्रदक्षिणा संचालन, दंड, नि:युद्ध, व्यायाम योग, योगासन, घोष सांघिक गित, शारीरिक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. उत्सवाला महानगरातील संत व मान्यवर मंडळी, संघप्रेमी नागरिक, माता - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. कमलताई गवईंचा शुभेच्छा संदेश
आपल्या शुभेच्छा संदेशात डॉ. कमलताई म्हणाल्या, मानवी जीवन मानवी मूल्यांनी विकसित झाले असून भारतीय संस्कृती आणि सभ्यता जगाच्या परिप्रेक्षामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. भारत हा प्राचीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्टया जगाचा आदर्श राहिलेला आहे. तथागत बुध्द, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, संत कबीर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, स्वामी विवेकांनद, रामास्वामी पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांनी मानवी मूल्यांना विकसित करणारी थोर परंपरा भारतामध्ये निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता यांच्या आधारावर भारतीय संविधानाची उभारणी केली. ती आज भारताला आणि भारतीय नागरिकांना विकासाकडे घेऊन जात आहे. भारत हा सामाजिक, सांस्कृतिक, भाषिकदृष्टया वैविध्यानी नटलेला देश असून आजपर्यंत लोकशाही मूल्यांना केंद्रवरती ठेऊन त्याची विकासाकडे वाटवाल चालू आहे. भारताला आपल्याला एकजीव व सक्षम असे राष्ट्र म्हणून निर्माण करायचे असून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्ष यांच्या माध्यमातूनच ते निर्माण करता येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनाही उपरोक्त मानवी आणि संविधानिक मुल्यांच्या माध्यमातून भारताला सक्षम राष्ट्र म्हणून विकसित करण्याची अधिक संधी आहे. आज ५ ऑक्टोंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी पूर्ती विजयादशमी उत्सव होत असून सदर कार्यक्रमास मी काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही. या कार्यक्रमासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा...!संपूर्ण मंगल मैत्रीसह असे संदेशात नमुद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी