नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर (हिं.स.) जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत भारताने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी केली, ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह भारताने एकूण 22 पदके जिंकली आणि १० वे स्थान पटकावले. २२ पदकांव्यतिरिक्त, भारतीय खेळाडूंनी तीन अजिंक्यपद विक्रम, सात आशियाई विक्रम आणि नऊ वेळा चौथे स्थान पटकावले. देशात पहिल्यांदाच झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३० हून अधिक वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी भारतीय खेळाडूंनी केली.
पंतप्रधानांनी या प्रसंगी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना पंतप्रधानांनी लिहिले की, आपल्या पॅरा-अॅथलीट्सनी ऐतिहासिक कामगिरी केली. या वर्षीची जागतिक पॅरा-अॅथलीटिक्स अजिंक्यपद स्पर्धा खूप खास होती. भारतीय पथकाने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. ६ सुवर्णपदकांसह २२ पदके जिंकली. आमच्या खेळाडूंचे अभिनंदन. त्यांच्या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल. मला माझ्या पथकातील प्रत्येक सदस्याचा अभिमान आहे आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. दिल्लीत ही स्पर्धा आयोजित करणे देखील भारतासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे १०० देशांतील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे आभार.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे