पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त
पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील मेट्रोला तंबाखूजन्य पदार्थांचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. अवघ्या आठवडाभरात मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर सर्वाधिक १२.४६ किलो सुट्टी तंबाखू जप्त करण्यात आल
Metro Train


पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील मेट्रोला तंबाखूजन्य पदार्थांचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. अवघ्या आठवडाभरात मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर सर्वाधिक १२.४६ किलो सुट्टी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुटख्याच्या ९८६ पुड्या, गायछापच्या १३८९ पुड्या, तर १३२५ लाइटर आणि माचिस या वस्तू आढळून आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, बेशिस्त प्रवाशांना वारंवार आव्हान करूनही स्थानकांंच्या भिंती, सरकते जिने, बाहेरील भिंती रंगवून ठेवल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्वच्छ, सुलभ आणि आरामदायी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनपुढे (महामेट्रो) नवीन आव्हान पुढे उभे राहिले आहे.

पुण्यातील पीसीएमसी ते स्वारगेट (पर्पल लाईन) या मार्गावर आणि वनाज ते रामवाडी (ब्ल्यू लाईन) या मार्गावरील मेट्रो प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. आरामदायी आणि सुकर प्रवास होत असून महामेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही बेशिस्त प्रवाशांमुळे सुंदर, स्वच्छ मेट्रोची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच मेट्रो, रेल्वेमध्ये ज्वलनशील पदार्थांची वाहतूक तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वर्ज्य आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही हे पदार्थ हानिकारक असताना, अनेक प्रवाशांकडून मेट्रो स्थानकांवर, सरकत्या जिन्यांवर पान, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन भिंती, परिसर अस्वच्छ करण्याचे प्रकार केले जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande