रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : कोल्हापूर येथे झालेल्या केएससी लोहपुरुष स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन आणि कोकण ट्रायथलिट क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अभिजित पड्याळ आणि रुचिरा जाधव-साळवी यांनी ड्युओथलॉनमध्ये पोडियम, तर विनायक पावसकर यांनी ट्रायथलॉनमध्ये चांगली कामगिरी केली.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रॅक्टिस रन आणि कोकण ट्रायथलिट क्लबच्या माध्यमातून कोकणामध्ये आणि रत्नागिरी शहरामध्ये स्पोर्ट्स कल्चर वृद्धिंगत होऊ लागले आहे. आज कोल्हापूरमध्ये झालेल्या केएससी ट्रायथलॉन स्पर्धेत रत्नागिरीतील २५ पेक्षा जास्त धावपटू, सायकलपटू, जलतरणपटू सहभागी झाले. या तिन्ही क्लबमध्ये अॅक्टिव्ह असलेले डॉक्टर नितीन सनगर या उपक्रमाचे इव्हेंट अँबॅसॅडर होते.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकलपटू दररोज रत्नागिरी तसेच आजूबाजूच्या संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये रपेट मारत असतात. नित्यनिरन्तरगतिशीला: या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची वाटचाल सुरू आहे. कोकणामध्ये मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सायकलिंगला रनिंगची जोड मिळत आहे. दर रविवारची प्रॅक्टिस रन म्हणजे सर्व वयोगटातील धावपटूंसाठी एक पर्वणी ठरते आहे. यालाच कोकण ट्रायथलिट क्लबची जोड मिळाली आहे. त्या माध्यमातून ट्रायथलॉन तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करून ट्रायथलॉनसाठी कोकणवासीय तयार होत आहेत.
कोल्हापूर ड्युओथलॉन ट्रायथलॉन स्पर्धेत अभिजित पड्याळ आणि रुचिरा जाधव- साळवी यांनी ड्युओथलॉन प्रकारात पोडियम फिनिश केला.
विनायक पावसकर यांनी देखील ओलीम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, अगदी थोड्या फरकाने त्यांचे पोडियम हुकले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी