परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) येथील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी परभणीत विक्रमी पाऊस झाला आहे. एकाच दिवसात तब्बल ९८.२ मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीपेक्षा जवळपास ७५ पट अधिक आहे. या काळात नेहमीचा पाऊस फक्त १.३ मिमी असतो. आजचे कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.
या वर्षी १ जानेवारीपासून आतापर्यंत एकूण १२२६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर नेहमीचा पाऊस फक्त ८५६.१ मिमी इतका असतो. तर १ जूनपासून आतापर्यंत म्हणजेच खरीप हंगामात एकूण ११०६.७ मिमी पाऊस पडला असून तोही सरासरीपेक्षा सुमारे ३०० मिमीने अधिक आहे.
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कृषी विद्यापीठ परिसर, सुयेश कॉलनी, सोमेश्वर नगर या भागांत घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हवामान खात्याने पुढील २४ तासांत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis