ओटावा, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।गैंगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या टोळीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हा घडवल्याचा दावा केला आहे. कॅनडामध्ये रविवारी (५ ऑक्टोबर) उशिरा रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेंस बिश्नोईच्या टोळीने सोशल मीडियावरून घेतली आहे.
लॉरेंस बिश्नोई टोळीच्या वतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून, त्यामध्ये गोळीबारामागील कारण देखील स्पष्ट करण्यात आले आहे. लॉरेंस टोळीशी संबंधित फतेह पोर्तुगाल याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दावा केला आहे की नवी तेसी नावाच्या व्यक्तीने लॉरेंस बिश्नोईच्या नावावरून लोकांकडून ५ मिलियनची खंडणी उकळली आहे, म्हणूनच त्याच्या ठिकाणांवर गोळीबार करण्यात आला.
फतेह पोर्तुगाल याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे,“सत श्री अकाल, राम-राम सगळ्या भावांना. मी फतेह पोर्तुगाल बोलतोय. गोल्डी ढिल्लों आणि लॉरेंस बिश्नोई टोळी. जे जे लोक कॅनडामध्ये लॉरेंस टोळीच्या नावावर वसूली किंवा गोळीबार करत आहेत, त्याची जबाबदारी आता आम्ही घेत आहोत. नवी तेसीने बिश्नोई टोळीचे नाव घेऊन गायकांकडून ५ मिलियनची खंडणी वसूल केली आहे, म्हणूनच आम्ही त्याच्या मागे लागलो आहोत.”
त्याने पुढे लिहिले, “आम्हाला मेहनती लोकांशी कुठलीही दुश्मनी नाही. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत आणि आमच्या तरुणांचा सन्मान करतात, त्यांच्याशी आमचा काहीही वाद नाही. परंतु जर कोणी चुकीची माहिती पसरवली, आणि त्यामुळे एखाद्या व्यापाऱ्याच्या जीवाला किंवा व्यवसायाला इजा झाली, तर त्याची जबाबदारी आमची नसेल, ती तुमची असेल. आमची पद्धत कदाचित चुकीची वाटू शकते, पण आमचा हेतू चुकीचा नाही.”काही दिवसांपूर्वीच कॅनडा सरकारने लॉरेंस बिश्नोईच्या टोळीला अधिकृतपणे दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हत्या, गोळीबार, जाळपोळ, जबरदस्तीने खंडणी आणि धमकी यांद्वारे भीती निर्माण करण्याचे आरोप सरकारने या टोळीवर ठेवले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode